गोंदिया जिल्ह्यात आज सकाळ पासूनच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या धान पिकाला बसला आहे.
गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाची शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, धान कापून आपल्या शेतामध्ये ठेवला होता. परंतु अवकाळी पावसामुळे हा संपूर्ण धान आता खराब झाल्याचे चिन्ह दिसत आहे. हा कापून ठेवलेला धान पावसाच्या पाण्याने भिजला असल्यामुळे काळा पडणार आहे आणि त्यामुळे या शेतमालाला भाव सुद्धा कमी मिळणार आहे.
असे धान व्यापारी आणि शासकीय आधारभूत खरेदी केंद्र घेणार की नाही? याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, आर्थिक भुर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.
