मुंबई:
उत्तर – पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे – महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दणदणीत रोड शो केला. आदित्य ठाकरे यांच्या रोड शो ची सुरवात शिवटेकडी, लिंक रोड येथून होवून समर्थनगर-आनंदनगर येथे समाप्त झाली.
या रोड शोला परिवर्तनासाठी उत्सुक असलेल्या मतदारसंघातील तरुण, सर्वसामान्यांसह पेटत्या मशाली घेऊन महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेना नेते ॲड. अनिल परब, शिवसेना नेते व आमदार सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश शेट्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस, माजी नगरसेवक बाळा नर अणि माजी नगरसेविका शिवानी परब यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विभागातील स्थानिक नागरीकांचाही सहभाग मोठया प्रमाणात होता. ’हाती घेऊन मशाल, गद्दारांना करू तडीपार’ शिवसेना झिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
