मुंबई
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. तसेच काही पक्ष, संघटना महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा देताना दिसत आहेत.
अशातच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना तृतीयपंथी समुदायाने पाठिंबा दर्शविला आहे. गोरेगाव पश्चिम येथील किर्तीकरांच्या कार्यालयात आज तृतीयपंथी समुदायाने महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची भेट घेतली. यावेळी अमोल किर्तीकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही आभा यांना भेटलो होतो. त्यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली. या विभागात तृतीयपंथी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या मागण्या संसदेत मांडून त्यांना त्यांच्या पायावर कसे उभे राहता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. अमोल किर्तीकर हे आमचे प्रश्न नक्कीच सोडवतील अशी भावना आभा यांनी व्यक्त केली आहे.
