नांदेड़ :
काल दुपारी ४ वाजता अष्टविनायक नगरमध्ये ज्येष्ठ नागरीकावर गोळीबार करून लुट करणाऱ्या दोन चोरट्यांसह त्यांचा खबरी अशा तिघांना स्थानिक गुन्हा शाखेने चार तासात ताब्यात घेतले आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत त्वरीत कार्यवाही घडली आहे. दरोडेखोरांना पकडताना पोलीसांनी गोळीबाराचे प्रति उत्तर गोळीबार करत दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.
काल दि.७ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्यासुमारास अष्टविनायकनगर भागातील रविंद्र रामचंद्र जोशी हे ६८ वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी बॅंकेतून पैसे काढून आपल्या घरातील गेटमध्ये आल्यानंतर त्यांच्या पाठीमागे आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. पण ६८ वर्षात सुध्दा बहाद्दर असलेल्या जोशी यांनी एका दरोडेखोराला खाली पाडले. परंतु या चोरट्यांनी जोशी यांच्यावर गोळीबार करत त्यांच्याकडील ४०हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेला. यामध्ये रविंद्र जोशी हे जखमी झाले आहेत.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. घडलेल्या घटनेची माहिती मिळातच विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली आणि आपल्या अधिकाऱ्यांना योग्य सुचना केल्या आहेत. पोलीसांनी बॅंकेमधील सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्यातील एक व्यक्तीबाबत त्यांना माहिती प्राप्त झाली. त्याला ताब्यात घेतले तेव्हा दरोडोखोरांनी वापरलेली दुचाकी त्याचीच होती असे पोलीसांना समजले. प्रत्यक्ष दरोडा टाकणारे दोन असदवनमध्ये असल्याचे हरदिपसिंघ धिल्लो याने सांगितले.
त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार पवार, बालाजी यादगिरवाड, रणधिरसिंह राजबन्सी, देविदास चव्हाण, मुंडे, दादाराव श्रीरामे असे पथक असदवन भागात गेले. त्या ठिकाणी हरदिपसिंघ धिल्लोने दिलेल्या माहितीप्रमाणे पोलीसांनी त्या दोघांना ओळखले. तेव्हा त्यांनी सुध्दा पोलीसांना ओळखले आणि ते पळू लागले. दोन जण दोन वेगवेगळ्या दिशेने पळल्यानंतर दोन पोलीस पथक त्यांच्या मागे लागले.
त्यातील एकाने आपल्याकडे असलेल्या बंदुकीतून पोलिस पथकावर गोळीबार केला आहे. त्याच्या प्रति उत्तरात पोलीसांनी सुध्दा त्याच्या दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एका आरोपीच्या पायावर गोळी लागली असून व तो जखमी झाला. तेव्हा पोलीसांनी जखमी असलेल्या सरप्रितसिंघ उर्फ साजन दलबिरसिंघ सहोता (२४) रा.पंजाब यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या बाबत पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांनी स्वतंत्र तक्रार दिली आहे. हा सर्व घटनाक्रम रात्री ९।३० वाजेच्यासुमारास घडला. त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३५३, ३४ आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडलेले रोहित सतपाल कोंडा(२५) आणि हरदिपसिंघ धिल्लो या दोघांना भाग्यनगर पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.
