धुळे
धुळे शहराचे जीवन असणाऱ्या व गेल्या शंभर वर्षापासून धुळे जनतेला पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या नकाणे तलावात मागील पंचवीस वर्षात साठलेला गाळ काढण्याचे काम लोकसंग्रामतर्फे माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले होते. यासाठी आवश्यक असलेल्या पाटबंधारे विभागाच्या व महसूल विभागाच्या सर्व परवानग्या प्राप्तही केल्या. राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार‘ या संकल्पनेतून नकाणे तलावातून अक्षरशः हजारो टॅक्टर व डंपर भरून गाळ काढलाही. पण या सार्वजनिक कामात लोकप्रतिनिधी अथवा धुळेकरांचे सहकार्य मिळत नाही.
त्यामुळे साधनसंपन्न धुळेकरांच्या उदासिनतेला कंटाळून नकाणे तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम 10 मे पासून स्थगित करीत असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. धरणातील गाळ काढण्याची व पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची महाराष्ट्रात सर्व प्रथम धुळ्यातून नकाणे तलाव गाळमुक्त करण्याचा शुभारंभ करण्यात आला होता. राज्य सरकारने ही कल्पना राज्याचे धोरण म्हणून स्विकारली व अंमलात आणली. पण नंतर सलग पंचवीस वर्षात नकाणे तलावातील पाणी शहर वासियांची तहान भागविण्यासाठी वापरले. पण तलावात साठत असलेल्या गाळामुळे पाण्याची साठवण क्षमताच संपुष्टात येत असल्याचा कुणी गांभिर्याने विचार केला नाही.
धुळेकर जनतेचे दुर्भाग्य की, असे असंवेदशील लोकप्रतिनिधी हजार-दोन हजार रूपयांच्या लालचे पोटी मिळवून घेतले. अखेर व्हायचा तोच परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्यापासूनच धुळेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ-आठ, दहा-दहा दिवस वाट पहावी लागली. पिण्याच्या पाण्यासाठी धुळेकर जनतेला वणवण करावी लागल्या नंतरही निवडून दिलेले खासदार, आमदार, नगरसेवक यांनी या गंभीर विषयाकडे लक्षच दिले नाही. ही शोकांतिका होय असे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी संताप व्यक्त केला.
गेले महिनाभर सामाजिक बांधीलकी जपणारे किती दानशूर समोर येतात यांची मी प्रतिक्षा केली. निवडणुकीत कोट्यावधी रूपये वाटतांना कुणालाच संकोच वाटत नाही. जयंत्या, पुण्यतिथ्या, दहीहंडी, गणेशोत्सव, सार्वजनिक भंडारे, अशा कार्यक्रमांवर आपण सर्वच लक्षावधी रूपये उधळतो. पण किमान पिण्याच्या पाण्याची आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी काही व्यवस्था, सोय इतके वैचारीक दारिद्रय पहायला मिळावे यासाठी दुर्दैवाची अन् कुठलीही घटना नाही. ही उदासिनता समाजरचनेस घातक आहे. आपण सदर विषयाचा अत्यंत गांभिर्याने सखोल विचार करून येत्या दहा मे पासून नकाणे तलावातील गाळ मुक्ततेचे काम स्थगित करीत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
