नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना व स्थलांतरित लोकसंख्या यामुळे हे क्षेत्र हिवताप व डेंग्यू या आजारांसाठी संवेदनशील आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण तसेच साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळी नाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण तसेच राबविण्यात येणा-या जनजागृती मोहीमा यांच्या माध्यमातून प्राधान्याने हिवताप व डेंग्यू आजारांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या अनुषंगाने १६ मे २०२४ रोजीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात १६ मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे यावर्षीचे घोषवाक्य ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा ( Connect With Community, Control Dengue)‘ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार डेंग्यूविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग घेऊन डेंग्यू आजारास प्रतिबंध करणे हे राष्ट्रीय डेंग्यु दिनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिबंधात्मक तसेच जनजागृतीपर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिनी अर्थात १६ मे रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मोठी बांधकामे वा झोपडपट्टी अशा एकूण ३८ ठिकाणी डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, १६ ते २१ मे २०२४ या कालावधीत प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक व खाजगी प्रयोगशाळा प्रमुख यांची प्रत्यक्ष सभा घेऊन त्यांना हिवताप, डेंग्यू, साथरोग, जलजन्यरोग याबाबत संबोधित करण्यात येणार आहे.
याच १६ ते २१ मे कालावधीत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कामगारांच्या सभा घेऊन फवारणी काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दि. २१मे २०२४ रोजी मुख्यालयातील आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डेंग्यू हा विषाणुजन्य आजार असून, डेंग्यू विषाणू संक्रमित एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्यामुळे तो प्रसारित होतो. हा एडिस एजिप्ती डास गच्चीवरील व घराच्या परिसरातील पाण्याच्या साठ्यात तसेच भंगार साहित्य, टायर्स, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, घरावर टाकलेले प्लास्टिक आच्छादन, कुंडयांखालील ताट, कुलर्समधील पाणी अशा पाणी साचलेल्या ठिकाणी अंडी घालतो आणि डास उत्पत्ती होते. ही डास उत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घेणे व झाल्यास ती तात्काळ नष्ट करणे गरजेचे ठरते.