शिक्षकांच्या मताचा अधिकार सुरक्षित
शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश
दि. 14 मे 2024 :
शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. अखेर आनंदाची बातमी आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती. भारत निर्वाचन आयोगाने याबाबतची प्रेस नोट जारी केली आहे.
10 जूनला शिक्षक व पदवीधर मतदार संघात निवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे हजारो शिक्षक मतदानापासून वंचित राहणार होते. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षकांचा मताधिकार सुरक्षित केल्याबद्दल सुभाष किसन मोरे यांचे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जून पर्यंत सुट्टी कालावधी जाहिर केला असून शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबाह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्यावतीने निवडणूक आयोग आणि हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता.
