भिवंडी दि.९ (प्रतिनिधी) :
भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यावसायिकांची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.याच क्रमाने एका यंत्रमाग कापड व्यावसायिकाची २३ लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपासना कमल खंबानी, कमल खंबानी, संजय आणि सुनील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वरील चौघा आरोपींनी आपसात संगनमताने भिवंडीतील कल्याण रोड येथील ट्राफिक ऑफिसच्या जवळील गोपाळ नगर परिसरात कच्चा कापड खरेदीसाठी राधे-राधे फॅब्रिक्स आणि रिद्धी-सिद्धी क्रिएशन्स या बनावट नावाने कार्यालय सुरू केले.दरम्यान चौघांनी १४ मे रोजी भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक मोहम्मद हुसेन मकबूल हुसेन खान यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्याशी तब्बल २३ लाख ९२ हजार ६९५ कच्चे कापड खरेदीचा व्यवहार करून मोहम्मदसह अनेकांची फसवणूक केली आहे.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहम्मदने शांतीनगर पोलिस ठाणे गाठून ७ जून रोजी चौघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सपोनि अरूण घोलप करीत आहेत.