विरार प्रतिनिधी,१७ जून :
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०२१ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दि. २३/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्तालय मिरा-भाईंदर, वसई-विरार या आस्थापनेवर सन २०२२-२३ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी २३१ पदे भरण्याकरीता पोलीस शिपाई पदाची भरती करण्यात येणार आहे.या पोलीस भरतीसाठी रिक्त २३१ पदाकरीता १५२३ महिला तसेच ६९०० पुरुष असे एकुण ८४२३ अर्ज प्राप्त आहेत.या पोलीस शिपाई भरतीसाठीची मैदानी चाचणी दि. १९ जून ते २५ जून या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर प. या ठिकाणी घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीमध्ये पुरुषांकरीता १६०० मी. धावणे, १०० मी. धावणे व गोळाफेक तसेच महिलांकरीता ८०० मी. धावणे, १०० मी. धावणे व गोळाफेक चाचण्या घेतल्या जातील.
सद्या पावसाळा सुरू झाल्याने जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख दिली जाणार आहे.
तसेच काही उमदेवारांना वेगवेळ्या पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणीकरीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाल्या असल्यास अशा उमेदवारांनाही मैदानी चाचणीकरीता दुसरी तारीख दिली जाणार आहे.तारीख बदलुन घेणाऱ्या उमेदवारास तो पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचा लेखी पुरावा दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी सादर करावा लागेल.शिवाय उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. असे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. पावसाळा सुरु झाला असल्याने मैदानी चाचणीकरीता येणाऱ्या उमेदवारांनी त्याअनुषंगाने योग्य ती काळजी घ्यावी. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर कोणीही मुळ कागदपत्र घेऊन येऊ नये. फक्त कागदपत्रांचे झेरॉक्स कॉपी घेऊन याव्यात असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून उमेदवारांना करण्यात आले आहे.सदर भरती प्रक्रियेकरीता मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे ०१ पोलीस उप आयुक्त, ०५ सहायक पोलीस आयुक्त, ६४ पोलीस अधिकारी, २९६ पोलीस अमंलदार व २४ मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.