मुंबई प्रतिनिधि,दि २१ जून :
रणजी ट्रॉफीमध्ये गेस्ट प्लेअर आणि नंतर लोकल प्लेअर म्हणून खेळवण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीच्या सहा खेळाडू तरुणांची सुमारे ६३ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन भामट्यांविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
प्रशांत वसंत कांबळे आणि देवेश उपाध्याय, अशी या दोघांची नावे आहेत. प्रशांत कांबळे हा या कटातील मुख्य आरोपी आहे, तर देवेशने तो सिनेअभिनेता सोनू सूदचा सहाय्यक असल्याची बतावणी केली होती. या सहाही खेळाडूंना बिहार, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम क्रिकेट असोसिएशनचे बोगस नियुक्तीचे पत्र देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
संतोष रावसाहेब चव्हाण हे मूळचे रत्नागिरीच्या चिपळूण, खेर्डीचे रहिवासी आहेत. त्यांचा स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय असून ते भाजपचे जिल्हा सहचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीकडून राजकीय कार्यक्रम, लग्नाचे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाते. अशाच कार्यक्रमांदरम्यान त्यांची प्रशांत कांबळे याच्याशी रत्नागिरीमध्ये ओळख झाली होती. ते दोघेही रत्नागिरी संघाकडून क्रिकेट खेळले होते. नंतर प्रशांतची मुंबई संघाकडून अंडर २३ मध्ये निवड झाली होती. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री होती. याचदरम्यान त्याने त्यांची ओळख देवेशशी करून दिली होती. देवेश हा सिनेअभिनेता सोनू सूदकडे सहाय्यक म्हणून काम करतो, असे सांगितले होते. काही महिन्यांनंतर त्याने बीसीसीआयमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. त्यामुळे संतोष यांनी त्यांच्या परिचित सहा तरुणांची निवड करून प्रशांतकडे त्यांची शिफारस केली होती. सविस्तर चर्चा करून त्याने संतोष चव्हाण यांच्याकडून माहितीसह इतर कागदपत्रे घेतली होती, तसेच सहा तरुणांकडून सुमारे ६३ लाख रुपये घेऊन या पैशांचा परस्पर अपहार केला. हा प्रकार उघडकीस येताच तरुणांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती.