Civics

धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर

Share

विरार , २४ जून :


कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील तब्बल ११ धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. या कामांसाठी अंदाजित ७० कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.मात्र निवडणुकीनिमित्ताने लागलेल्या आचारसंहितेमुळे या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित आहे, अशी माहिती पालघर जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जुलै २०२३ पासून या कामांसाठी प्रत्यक्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पालघर जिल्ह्यातील धूपप्रतिबंधक बंधारे, खार बांध, बहुउद्देशीय निवारा केंद्र व भूमिगत विद्युत वाहिनी अशा तीन कामांसाठी २८३ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी अंदाजित ७० कोटींचा निधी केवळ वसई-पालघरमधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी खर्च होणार आहे.


वसई तालुक्यातील अर्नाळा, नवापूर, रानगाव, पाचूबंदर ही गावे समुद्रालगत वसलेली आहेत. या परिसरात धूपप्रतिबंधक बंधारे बांधलेले नसल्याने दरवर्षीच्या पासाळ्यात या गावांना उधाणाचा फटका बसतो. दीर्घ पावसात व तुफानादरम्यान समुद्राचे पाणी गावांत शिरत असल्याने आर्थिक व जीवितहानी संभवते. शिवाय उधाणाच्या पाण्याने समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप झालेली आहे. त्यामुळे या गावांना उधाणाच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी समुद्रालगत नव्याने धूपप्रतिबंधक बंधारे तातडीने बांधणे व असलेल्या बंधाऱ्यांचे तातडीने मजबुतीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा जुलै २०२३ रोजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंत्री, बंदरे आणि क्रीडा व युवककल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याजवळ व्यक्त केली होती.
विशेष म्हणजे जुलै २०२२ मध्ये उधाणाच्या पाण्याने नवापूर समुद्रालगत धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने या किनाऱ्यालगतची वाळू खचली होती. समुद्राचे पाणी किनाऱ्यालगतच्या गावांत शिरल्याने नागरिकांच्या घरांचे व शेतीचे अतोनात नुकसान झालेले होते. त्या वेळी नवापूर येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधून मिळावा आणि या कामाला गती मिळावी, यासाठी अर्थसंकल्पात या कामाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी नियोजन समिती आणि पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.


दरम्यानच्या काळात फेब्रुवारी २०२३ मध्ये पतन अभियांत्रिकी विभागाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातील कामांचे प्रस्ताव प्रथम प्राधान्याने जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरीसाठी मागविले होते. यात कोकण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत प्रथमत: पालघर व रायगड जिल्ह्याला निधीतून वगळण्यात आले होते.परंतु आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करून पालघर जिल्ह्यातील धूप प्रतिबंधक बंधारे, बहुउद्देशीय निवारा केंद्र तसेच भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी २८३ कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता.महत्त्वाचे म्हणजे; वसई तालुक्यातील अर्नाळा, नवापूर, रानगाव, पाचूबंदर या गावांसह पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणूतील गुंगवाडा, डहाणू गाव, डहाणू आगार, केळवे, नरपड, तडीपाले या गावांतील धूप प्रतिबंधक बंधारेही या निधीतून मार्गी लागणार आहेत.

Related posts

कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्याबाबतचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले निर्देश

editor

सर्वाधिक पुरवणी मागण्यांचा विक्रम, ९४००० कोटींच्या मागण्या सादर

editor

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन

editor

Leave a Comment