धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड परिसरातील एका कापड दुकानांमध्ये आज रात्रीच्या सुमारास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेला गोपनीय माहितीनुसार केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 55 लाख रुपयांची रोकड पोलिसांना मिळून आली आहे. सदरच्या केलेल्या या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण-घेवाण होत असते, या देवाण घेवाणीवर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाचे संपूर्ण लक्ष ठेऊन आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील एका कापड व्यवसायिकाच्या दुकानातून धुळे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल 55 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केले आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना ही गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यांनी या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रवाना केले आणि धुळे शहराचे मुख्य बाजारपेठ मधील आग्रा रोड वरील एक कापड दुकानातून ही रोकड जप्त करण्यात आलेली आहे. ही लाखो रुपयांची रोकड ज्या दोन लोकांनी या दुकानावर आणून दिली होती ते दोघेजण आणि दुकान मालक असे तीन जण आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्या व्यक्तीची ही रोकड असल्याचे सांगितले जात आहे, तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाई पोलिसांना मिळून आलेल्या लाखो रुपये मोजण्याचं आणि पुढची कारवाई करण्याचं काम आता सुरू आहे. मात्र या दरम्यान निवडणूक आयोगाला या कारवाईची माहिती देण्यात आलेली आहे. निवडून आयोग आणि आयकर विभाग या नोटांची तपासणी करतील आणि नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपये नेमके कशासाठी आणले गेले होते आणि त्याच्या मागे उद्देश काय आहे याची चौकशी सखोल केली जाणार आहे. अजूनही कारवाईचे काम सुरू आहे.
यावेळी पोलिसांनी सांगितले की उद्या सकाळ पर्यंत अधिक माहितीही लवकरच उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे. सध्या धुळे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अशा या रणधुमाळीच्या दरम्यान धुळे स्थानिक पोलीस शाखेच्या वतीने 55 लाख रुपयांची रोकड हस्तगत करणे हे पोलिसांचं मोठं यश आहे असं म्हटलं जात आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की यापुढे या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरच माहिती समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
