Environment

आंब्याच्या कोयी संकलन उपक्रमात दोन दिवसात २५ हजारहून अधिक कोयींचे संकलन

Share

संकलित कोयींतून नवी मुंबईतील निसर्ग संवर्धनासाठी आम्रवृक्षांची होणार लागवड

रेड एफएम वाहिनीच्या ‘गुठली रिटर्न्स’ उपक्रमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार १ लाखांहून अधिक कोयी

मुंबई,७ जून :

आंबा खाऊन झाल्यानंतर नागरिकांकडून ओल्या कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या आंब्याच्या कोयी (Mango Seeds) वेगळया संकलित करुन त्यापासून आम्र वृक्षाची रोपे तयार करुन त्याची लागवड केल्यास पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण होईल या भूमिकेतून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. याकरिता सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स अशा ठिकाणांहून कोयी संकलनासाठी परिमंडळ १ व परिमंडळ २ क्षेत्रासाठी विशेष वाहने तयार करण्यात आली.

या आंब्याच्या कोयी संकलन उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिकांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला असून पहिल्या दिवशी १२ हजार तर आज दुसऱ्या दिवशी १३ हजार अशा दोन दिवसात २५ हजाराहून अधिक आंब्याच्या कोयी महानगरपालिकेकडे जमा करण्यात आलेल्या आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने आंब्याच्या सुकलेल्या कोयी जमा करण्याचे विविध माध्यमांतून आवाहन केल्यापासूनच नागरिकांनी हा अतिशय वेगळा उपक्रम असल्याचे नमूद करीत यामध्ये उत्साही सहभाग घेतला आहे.

यात आणखी एक विशेष बाब म्हणजे ‘रेड एफएम’ या लोकप्रिय एफएम रेडिओ वाहिनीव्दारे अशाच प्रकारचा ‘गुठली रिटर्न्स’ हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती प्राप्त झाली. या वाहिनीकडे संकलित होणा-या कोयी ते ग्रामीण भागातील शेतक-यांपर्यंत आंबा रोप लागवडीसाठी पोहचवून त्यांना शेतीसोबत उदरनिर्वाहाचा आणखी एक पर्याय उपलब्ध करून देत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेकडे मोठ्या संख्येने कोयी संकलित होणार असल्याने त्यामधील काही कोयीतून निर्माण होणारी आम्रवृक्ष रोपे नवी मुंबईतील निसर्ग संवर्धनासाठी ठेवून उर्वरित कोयी या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी देण्याची संकल्पना पुढे आली. रेड एफएम वाहिनीने नवी मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराचे उत्स्फुर्त स्वागत केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रेड – एफएम वाहिनीवरून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी आरजे मलिष्का यांनी गुठली रिटर्न उपक्रमाबाबत संवाद साधला. रेड – एफएम वाहिनीच्या हजारो श्रोत्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने गुठली रिटर्न्स या पर्यावरणशील उपक्रमात पुढाकार घेऊन सहकार्याची भूमिका ठेवल्याबद्दल कौतुक केले. महापालिका आयुकत्‍ डॉ. कैलास शिंदे यांनी साधारणत: १ लाख आंब्याच्या कोयी उपलब्ध्‍ करुन देणार असल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या वृक्ष संवर्धनासोबतच रेड एफएम वाहिनीच्या गुठली रिटर्न्स या उपक्रमाला सहकार्य करुन महानगरपालिका बळीराजालाही मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपत आहे.

५ जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु झालेला हा आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलन उपक्रम १५ जूनपर्यंत राबविला जात असून नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर कोयी ओल्या कच-यात न टाकता एखाद्या भांड्यात स्वच्छ धुवून घ्याव्यात व उन्हात सुकवाव्यात आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनात वर्तमानपत्रे अथवा बॉक्समध्ये पॅक करून द्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.

Related posts

Cyclone Remal: Coastal Concerns Rise as Landfall Looms

editor

Pre-Monsoon Rains Offer Relief to South, North Gripped by Scorching Heatwave

editor

ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव करताना पर्यटकांना दिसले ६०३ वन्यजीव

editor

Leave a Comment