Mahrashtra politics

आघाडीने वंचितला जाणीवपूर्वक डावलले : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Share

आघाडीच्या जाळ्यात अडकल्याची कबुली

मुंबई प्रतिनिधी , १० जून :

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामावून घेतले नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केला. महाविकास आघाडीच्या बैठकांसाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व प्रसारमाध्यम आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान तसेच आमच्या पक्षाप्रति महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो, अशी कबुलीही आंबेडकर यांनी दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला दारुण अपयश आले. २०१९ च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत वंचितला मिळालेल्या मतांमध्ये प्रचंड मोठी घट झाली. स्वबळावर लोकसभेच्या सहा जागा निवडून येणार असल्याचा दावा करणाऱ्या वंचितला मतदारांनी जमिनीवर आणले. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात त्यांनी वंचितच्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीवर फोडले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अकोला आणि उत्तर मुंबई या दोन जागा देऊ केल्या होत्या, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे

वंचित बहुजन आघाडीनेच आंबेडकरी चळवळ आणि संविधान वाचवण्याच्या लढ्याचे नेतृत्व केले होते. जेव्हा या प्रमुख पक्षांचे सदस्य सौम्य हिंदुत्वात गुंतले होते आणि एनडीए १ आणि २ च्या सरकारच्या काळात राज्यघटनेत करण्यात येत असलेल्या सुधारणांवर मौन बाळगून होते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत लढण्याचा अजेंडा नसल्याचे इंडिया आघाडीच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर केला. ‘संविधान वाचविण्याचा लढा’ आमच्या तत्त्वज्ञानातून आणि मोहिमेतून त्यांनी घेतला. इंडिया आघाडीने दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम हे भाजपशी लढण्यास सक्षम विरोधक असल्याचे मतदारांना पटवून दिले. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांना केवळ स्वत:ला वाचवायचे होते आणि यासाठी त्यांनी बहुजनांच्या मतांचा वापर केला, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. त्यांना सांगितले गेले की, फक्त आणि फक्त इंडिया आघाडीला मतदान केल्यास भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएपासून देश वाचवू शकतो. परंतु, तरीही एनडीए बहुमत मिळवण्यात यशस्वी झाला. इंडिया आघाडीतील पक्षांचा ढासळणारा वाडा वाचवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने उभारण्यासाठी बहुजन मतदारांच्या स्वतंत्र नेतृत्वाचा स्वत:चा बालेकिल्ला पाडायला भाग पाडण्यात आले. या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिक दृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचे असते तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती,असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत. पण आशा सोडलेली नाही. आम्ही आत्मपरीक्षण करून वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीतील त्रुटी तपासून आवश्यक त्या उपाययोजना जरूर करू. वंचित बहुजन आघाडीचा मूळ पायाच फुले-शाहू-आंबेडकर असून, “जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम” यांच्याकडूनच आम्हाला ताकद मिळते. आमची बांधिलकी निरपेक्ष आहे. सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांची बाजू मांडणे आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्व आणि हक्कांसाठी लढणे हेच आमचे ध्येय आहे, असेही आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

Related posts

राहुल गांधीच्या वक्तव्याचा भाजप कडून निषेध

editor

Supreme Court Orders Release of NewsClick Editor Prabir Purkayastha, Declares Arrest Illegal

editor

संघावर आणि अजित पवारांवर भुमिका मांडायला अमोल मिटकरी लहान आहेत – आ. प्रविण दरेकर

editor

Leave a Comment