छ.संभाजी नगर ,१० जून :
छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी फुटल्याने त्या परिसरातील असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरूर दुकानांमधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यात जायकवाडीतून पाणी उपसा सुरू करण्यात आला. शहरातील जलकुंभांमध्ये पाणी येऊन पडत नाही तोच रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी अचानक फुटली.
जलवाहिनी फुटल्यानंतर त्यातून पाण्याचे उंच फवारे उडाले आणि त्यामुळे हे पाणी नागरिकांच्या दुकानांमध्ये शिरून नुकसान झाले आहे. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीचे काम सुरू करताच नागरिकांनी त्यात व्यत्यय आणला आहे. आधी दुकानातील पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, नंतरच दुरुस्तीचे काम सुरू करा, असा पावित्रा घेत नागरिकांनी दुरूस्तीचे काम थांबवले आहे.
सिडको वगळता जुने शहर आणि शहराच्या इतर भागाला या १४०० च्या वाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र रेल्वेस्टेशन पुलाखाली ही वाहिनी फुटल्याने जुन्या शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. लवकर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करू असे पाणीपुरवठा उपअभियंता मनपा मनोज बाविस्कर यांनी सांगितले आहे.