ठाणे, १० जून :
ठाण्यातील विरासत या ज्वेलर्स दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करताना, त्याच ज्वेलर्स दुकानातील सोने चोरी करून ३ ते ४ महिने परराज्यात इतरत्र फिरून चोरी केलेले दागिने विकून मिळालेल्या पैशातून अहमदाबाद येथे स्थायिक होण्याचा मनसुबा मनाशी करणाऱ्या विशालसिंग कानसिंग राजपूत (२९) या चोरट्याला ठाणे शहर पोलीस दलातील नौपाडा पोलिसांनी राजस्थानाच्या माउंट अबू पर्वत येथून अटक केली.
याचदरम्यान वेशांतर करून त्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यापैकी सुमारे एक कोटी २६ लाख रुपये किंमतीचे १७४५.०८० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. तसेच त्याला येत्या १२जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी यशवंत पुनमिया त्यांचे विरासत ज्वेलर्स नावाचे दुकान असून तेथे ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशालसिंग राजपूत याने त्यांचा विश्वासघात करुन त्याचे ताब्यात विश्वासाने सिध्दार्थ ज्वेलर्स येथून विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने विरासत ज्वेलर्स येथे न देता, विरासत ज्वेलर्स येथून इतर सेल्समनची नजर चुकवुन पुन्हा काही सोन्याचे दागिने असा एकुण एक कोटी ३० लाख १४ हजार ७२० रुपये किंमतीचे चोरी केली अशी तक्रार ११ मे २०२४ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली.
त्यानुसास तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांनी या गुन्हयाचा तपास करताना, विशालसिंग याने त्याचे साथीदारांसह अशाच प्रकारे रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी मुंबईतील एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. दरम्यान विशालसिंग याने दागिने चोरी केल्यानंतर त्याने त्याचा मुळगावाचा पत्ता पोलीसांना मिळू नये म्हणून त्याने ज्वेलर्स दुकानात असलेले त्याचे आधारकार्ड व इतर कागदपत्र चोरून नेली होती. तसेच तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावावर असून फोन बंद असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे विशालसिंग हा मुळ कोणत्या ठिकाणचा राहणारा आहे. येथून तपासाची सुरवात झाली. त्याचा शोध घेण्यासाठी ठाणे शहरातील तसेच इतर ठिकाणावरील सुमारे १०० हुन अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यातच त्याने ठाणे शहर ते वसई रोड जाण्याकरीता ८ ते १० रिक्षा बदलून प्रवास केला. याशिवाय त्याने एका हिंदी सिनेमामध्ये पुरावा नष्ट करण्याची पध्दत पाहुन त्याप्रमाणे अहमदाबाद येथे जाण्यापुर्वी पोलीसांची दिशाभुल करण्यासाठी त्याच्याकडील मोबाईल हा त्याने मुंबईच्या दिशेने जाण्याऱ्या एका ट्रकमध्ये टाकुन देत तो अहमदाबाद कडे रवाना झाला. त्यानंतर वसई रोड येथून अहमदाबाद, गुजरात येथे बसने गेला होता. तो फरार असताना याच काळात तो जैयसलमेर, पालनपूर, जोधपूर, डिसा, बिकानेर, उदयपूर, जयपूर, माउंट आबू पर्वत, अहमदाबाद, बनसाकांटा, गुजरात, राजस्थान अशा वेगवेगळया ठिकाणी रात्री बसने प्रवास करून, दिवसभर एखाद्या निर्जन ठिकाणी जावून फिरत असे अशाप्रकारे तो पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता.
तर पोलीसांनी त्याच्या नातेवाईक, पत्नी व मित्रमंडळींच्या हालचालींवर लक्ष ठेवुन त्याचा शोध घेत असताना २जून२०२४ रोजी तो राजस्थान येथील माउंट आबू पर्वत येथे असल्याची माहिती नौपाडा पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक रवाना झाले. तो उदयपुर येथुन माउंट अबु येथे आला असुन जंगलामध्ये लपलेला आहे. अशी माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर करुन जंगलामध्ये शोध घेताना तो अबु पर्वताच्या एका भागात दिसताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यापैकी सुमारे १कोटी २६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.