मुंबई प्रतिनिधी ,१४ जून :
लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस वगळता महायुतीचा एकही नेता उपस्थित नव्हता. दरम्यान, राज्यसभेच्या उमेदवारीची माळ सुनेत्रा पवार यांच्या गळ्यात पडल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, भुजबळ यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १८ जून अशी आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले जाईल. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर काम करण्यासाठी चार वर्षाची मुदत मिळेल. पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीचे राज्यसभेतील संख्याबळ दोन इतके होणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे २०२२ च्या राज्यसभा निवडणुकीत निवडून आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर प्रफुल्ल पटेल यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत पुन्हा राज्यसभा निवडणूक लढवली. पटेल यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. या मुदतीत सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज आला आहे. पवार यांनी आज दुपारी विधानभवनात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते वगळता शिवसेना किंवा भाजपचा एकही नेता, पदाधिकारी अर्ज भरताना उपस्थित नव्हता. यासंदर्भात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित रहा म्हणून महायुतीच्या कोणत्याही नेत्यांना निमंत्रण नव्हते. पोटनिवडणुकीतील जागा आमची असल्याने मित्र पक्षाच्या नेत्यांना आम्ही सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची कल्पना दिली, असे सांगितले.
दरम्यान, राज्यसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार निश्चितीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु, छगन भुजबळ यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी उमेदवार ठरविण्यासाठी बैठक घेतली जाते. याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित झालेला आहे, अशी नाराजी भुजबळ यांनी व्यक्त केल्याचे कळते. परंतु, आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भुजबळ यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्यासह बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे इच्छुक होते. मात्र, पक्षात चर्चा करून निर्णय होतात. सगळेच निर्णय काही आपल्या मनासारखे होत नाहीत, असे भुजबळ म्हणाले. तर राष्ट्रवादीने एकमताने सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे पक्षात नाराजी असण्याचे कारणच नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीमध्ये बसून निर्णय घेत असतो. पक्षाच्या हिताच्यादृष्टीने आणि भविष्याचा सारासार विचार करून निर्णय घेतला गेला आहे. पक्षात कुठलीच नाराजी नाही आणि महायुतीतही नाराजी अजिबातच नाही, असा खुलासा सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार प्रसार माध्यमांना सामोऱ्या गेल्या. यावेळी पत्रकारांनी बिनविरोध निवड, पक्ष तसेच महायुतीतील नाराजी याविषयी प्रश्न विचारले. या प्रश्नावर सुनेत्रा पवार गांगरलेल्या दिसल्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी उपस्थित असलेल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे सुनेत्रा पवार यांच्या मदतीला धावल्या. पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नावर सुनेत्रा पवार अडखळल्याने आदिती तटकरे यांना त्यांना प्रॉम्पटिंग करावे लागले.