मुंबई प्रतिनिधी ,१७ जून :
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केलेल्या बातमीचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी सोमवारी येथे केली आहे.
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे ४८ मतांनी विजय झाले आहेत. मात्र, या मतदारसंघातील मतमोजणी आणि ईव्हीएमविषयी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेतले आहेत. या मतदारसंघातील मतमोजणीविषयी एका इंग्रजी दैनिकाने बातमी प्रकाशित केली होती. मात्र, नंतर या दैनिकाने बातमी चुकीची असल्याचा खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले, इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रातील खोटी बातमी पोस्ट केली. त्या सर्वांनी माफी मागायला हवी. जर वृत्तपत्राने माफी मागितली आहे तर आदित्य ठाकरेंनीही माफी मागायला हवी. निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना एका वृत्तपत्राच्या खोट्या बातमीचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या निकालावर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी.
दरम्यान, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असा दावा निरुपम यांनी केला. जर ईव्हीएम हॅक होऊ शकते मग काँग्रेसच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का? असा प्रश्न निरुपम यांनी केला. सुमारे एक लाख मतांची मोजणी शिल्लक असताना उबाठा गटाचे अमोल कीर्तीकर विजयी झाले अशी बातमी संध्याकाळी ५.४० वाजता कशी व्हायरल होते? असा सवाल त्यांनी केला.
मतमोजणीवेळी तिथे मोबाईल घेऊन जाणाऱ्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार निवडणूक अधिकारी यांनी केली आहे. त्याबाबत चौकशी आणि कारवाई व्हावी, असे निरुपम यांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न उबाठाकडून केला जात आहे. खोट्या बातमीमुळे पोलीस, निवडणूक अधिकारी यांना बदनाम केले गेले. आमच्या पक्षाचीही बदनामी झाली. त्याबद्दल न्यायालयात दाद मागण्याबाबत पक्ष प्रमुख ठरवतील, असे निरुपम म्हणाले.
दैनिक ‘ सामना ‘त आज पुन्हा एक खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. सामानाच्या संपादक रश्मी ठाकरे आहेत. यांसदर्भात सामनाने जाहीर माफी मागितली नाही, तर प्रेस काऊन्सिलकडे दाद मागू, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.मातोश्री २ ही फेक नरेटिव्हची फॅक्ट्री आहे आणि त्याचे कारकून संजय राऊत आहेत, अशी टीकाही निरुपम यांनी केली.