मुंबई प्रतिनिधी ,१७ जून :
महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आपल्या निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या घोषित केल्या. महाराष्ट्रासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तर सह प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणूक अपेक्षित आहेत. त्यापाठोपाठ झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भाजपने निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी आपले प्रभारी नेमले आहेत.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी भूपेंद्र यादव हे भाजपचे निवडणूक प्रभारी होते. आता पक्षाने पुन्हा यादव यांना नेमले आहे. तसेच त्यांच्या मदतीला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवडणूक सह प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, हरियाणासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तर सह प्रभारी म्हणून खासदार बिप्लव कुमार देव यांची नेमणूक करण्यात आली आहे. झारखंडसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि सह प्रभारी म्हणून हिंमत सरमा यांच्याकडे सूत्रे देण्यात आली आहेत. तर जम्मू – काश्मीरचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.