मुंबई ,दि २० जून :
अमोल मिटकरी यांचा जीव केवढा, त्यांची कुवत, पत काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर, भाजपा नेतृत्वावर आणि अजित पवारांचे विचार यावर भुमिका मांडायला मिटकरी अजून लहान आहेत, असे विधान भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केले आहे. तसेच जे तोंडाळ, वाचाळवीर प्रवक्ते, नेते आहेत त्यांना पक्षनेतृत्वाने आवरायला हवे. कटुता निर्माण होणार नाही याची बोलघेवड्यांनी काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी शरद पवारांच्या विधानावर म्हटले की, पवारांचा हा सूचक इशारा काँग्रेसला दिसतोय. काँग्रेस ज्याप्रमाणे स्वबळावर लढायची भाषा करतेय त्यामुळे काँग्रेसला हा इशारा आहे किंवा उद्धव ठाकरे स्वतःहून मी एवढ्या जागा लढविणार अशा प्रकारचे घोषित करताहेत त्यामुळे नेमका पवारांचा बाण कोणाकडे आहे हे कळायला वेळ लागतो. परंतु हा काँग्रेसला सूचक इशारा दिल्याचे दिसून येतेय.
तसेच सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन येत नसते. सत्ता येत असते जात असते. पवार जे बोलताहेत ते सगळ्यांना लागू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामाजिक बांधिलकीबाबत कुणी शिकवूच नये. पवारांनी अडचणीतील लोकांना व्यक्तिशः किती मदत केली आणि एकनाथ शिंदे यांनी किती केली याची माहिती घेतली तर शिंदें एवढी समाजसेवा, संवेदना निश्चितच इतरांपेक्षा जास्त आहेत.
शरद पवार ५० वर्ष सत्तेचे राजकारण करताहेत. ते अनेक वर्ष मुख्यमंत्री, कृषिमंत्री होते. तुम्ही ५० वर्षाच्या कालावधीत किती लोकांच्या आयुष्यमानात बदल झाला आणि १० वर्ष मोदी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी नेमके काय केले याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडूया. त्यातून करणी आणि कथनीतील फरक कळून येईल, असेही दरेकर म्हणाले.
सत्ता क्षणिक आहे असे शरद पवार म्हणतात तशी त्यांची महाविकास आघाडीही तात्कालिक आहे. ज्यावेळी विधानसभा निवडणूक येईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यावेळी महाविकास आघाडी टिकणे अवघड आहे. कारण वेगवेगळ्या विचारधारांची लोकं एकत्रित आलीत. त्यांची मोट ही तात्कालिक आहे दीर्घकाळ टिकू शकत नाही, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना दरेकर म्हणाले की, गद्दार, खुद्दार अशा राणाभीमदेवी थाटातील गर्जना करणे हे संजय राऊत यांचे सकाळ, दुपारचे काम झालेय. स्वतः फुसका बार असून मोठंमोठ्या गोष्टी करायच्या हा संजय राऊत यांचा स्थायीभाव झालेला आहे. ते केवळ बोलू शकतात, कुठल्याही प्रकारची कृती, विकासाचा दृष्टिकोन त्यांचा अजिबात नाही.
त्याचबरोबर संजय राऊत यांनी आपल्या नवीन पक्षाचा उबाठाचा डीएनए चेक करावा. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊन त्याला काँग्रेसच्या चरणी गहाण ठेवलात. काँग्रेसची लाचारी केलीत. मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका, २५ वर्षाची युती बासनात गुंडाळलीत. मतांसाठी आणि सत्तेसाठी लाचार झालेल्या संजय राऊत यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. महायुतीला धोका देऊन सत्तेसाठी लाचारी केलीत. आता मतांसाठी हिरवी लाचारी केलीय.
फडणवीस यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चावर बोलताना दरेकर म्हणाले की, भाजपाचे केंद्रीय नेतृत्व सक्षम आहे. सर्व गोष्टीतून समन्वय साधून भविष्यात भाजपाला, महायुतीला महाराष्ट्रात कसे पुढे न्यायचे त्यासाठी आमचे सक्षम नेतृत्व आहे. ती योग्य दिशा दिलीय, भविष्यातही देतील. या राज्याचे, पक्षाचे नेतृत्व आमचे प्रगल्भ, लोकाभिमुख असणारे नेते देवेंद्र फडणवीसच करतील, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.