Civics Education

नमुंमपा शाळेतील पाचवी ते दहावीच्या 21 हजारहून अधिक विदयार्थ्यांनी उत्साहात केले ‘स्वच्छता मतदान’

Share

मुंबई प्रतिनिधि, ३ जुलाई :

स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सामोरे जाताना सर्व समाज घटकांचा सहभाग घेण्याची भूमिका नजरेसमोर ठेवत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार स्वच्छता कार्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे.

या अनुषंगाने शहराचे भविष्य असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मनातील शहर स्वच्छतेविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेता याव्यात व या माध्यमातून त्यांच्या मनावर नकळतपणे स्वच्छतेचा संस्कार व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या ८० शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वीच्या मुलांकरिता ‘स्वच्छता मतदान’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात २१ हजाराहून अधिक मुलांनी सहभागी होताना आपल्याला आई-बाबांसारखे मतदान करता येणार आहे याचा आनंद व्यक्त केला व अत्यंत उत्साहात स्वच्छतेचे मतदान केले.

‘नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी मतदान – विदयार्थ्यांचा अभिप्राय’ अशा शिर्षकाची मतपत्रिका (बॅलेट) प्रत्येक विदयार्थ्याला देण्यात आली होती. स्वच्छता विषयक ७ प्रश्नांची उत्तरे ‘हो / नाही’ स्वरूपात विदयार्थ्यांनी मतपत्रिकेवर नोंदवावयाची होती. या प्रश्नांमध्ये – तुमच्या घरातील कचरा घेऊन जाण्यासाठी परिसरात रोज घंटा गाडी येत काय?, तुमच्या घरातील कचरा ओला व सुका असा वेगळा करुन घंटा गाडीमध्ये जमा करता काय?, तुमच्या घराशेजारी असलेले नाले स्वच्छ आहेत काय?, तुम्हाला आपल्या शहरातील ‘थ्री आर’ केंद्रांची माहिती आहे काय?, अलिकडील काळात तुम्ही शहरातील सामुदायिक /सार्वजनिक शौचालयाचा वापर केला आहे काय?, शहरातील सामुदायिक/सार्वजनिक शौचालये स्वच्छ व व्यवस्थित आहेत काय?, डिजीटल नकाशांवर तुम्हाला जवळचे सामुदायिक/सार्वजनिक शौचालय शोधता येऊ शकते याची माहिती आहे काय? – अशा ७ प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नावलीनंतर ‘तुम्ही तुमच्या परिसराच्या एकूण स्वच्छतेचे मूल्यांकन कसे कराल?’ आणि ‘तुम्ही शहराच्या एकूण स्वच्छतेला किती गुण दयाल?’ असे दोन प्रश्न समाविष्ट होते व याची उत्तरे देताना विदयार्थ्यांनी ५ पैकी गुण नमूद करावयाचे होते.

विदयार्थ्यांच्या दृष्टीने हा मतदानाचा अनुभव अतिशय आगळावेगळा होता. त्यामुळे सर्व विदयार्थी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उत्सुक होते. शाळाशाळांमध्ये याकरिता मतदान केंद्रासारखी रचना करण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारा मतदान केंद्राध्यक्ष, मतदाराचे नाव पुकारणारा व ओळख पटविणारा मतदान अधिकारी – १, मतदानासाठी बोटावर शाई लावून परवानगी देणारा मतदान अधिकारी – २ व मतदाराच्या नावाची नोंद करणारा मतदान अधिकारी – ३ यांची नेमणूक करण्यात आली होती. सर्व विदयार्थ्यांनी आपल्याला दिलेल्या मतपत्रिकेवर नमूद ७ प्रश्नांची हो / नाही यापैकी उत्तरे देत व २ प्रश्नांना गुणांकन देत, स्वच्छतेचे अभिप्राय नोंदवून मतपत्रिका दुमडून मतपेटीत टाकली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घोषणा करुन मतपेटी सील करण्यात आली. सदर मतपेटी दुसऱ्या दिवशी उघडण्यात येऊन मतपत्रिकेवर नोंदविलेल्या प्रश्ननिहाय ‘होय किंवा नाही’ या खुणांच्या आधारे प्रपत्रामध्ये माहिती भरली जाणार आहे व ही प्रपत्रे एकूण मतदान निकालाच्या प्रतीसह मुख्याध्यापकांकडून संबंधित केंद्र समन्वयक यांच्याकडे जमा केली जाणार आहेत.

Related posts

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री शिंदेच्या सूचना

editor

सरकार मधून मला मोकळा करा पक्षाकडे विनंती – देवेंद्र फडणवीस

editor

भिवंडीत 12 वर्षांनंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू ! पालिका आयुक्तांची माहिती

editor

Leave a Comment