मुंबई , ७ जुलाई :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसीय बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथे करण्यात आले होते.पहिल्या दिवशी प्रवक्ता, युवती, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सामाजिक न्याय सेल, अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडली. तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, ओबीसी विभाग, सर्व फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख या सर्वांची बैठक झाली.
दुसऱ्या दिवशी झालेल्या युवकांच्या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘अजित युवा योद्धा’ सदस्य नोंदणी अभियानाची ऑनलाइन वेबसाईट प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आली. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी अजितदादांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या समर्थनात बैठकीत धन्यवाद फलक झळकावून अजितदादांचे अभिनंदन केले.विद्यार्थी सेलच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय अभ्यास महोत्सव‘ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यासोबतच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाविद्यालय तेथे शाखा‘ हे राज्यव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. महाविद्यालय विद्यार्थी मदत कक्ष उपक्रमाचा शुभारंभ आणि Join NSC या उपक्रमाची सुरुवातही यावेळी करण्यात आली.
या बैठकीला मार्गदर्शन करताना खासदार सुनिल तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यंदा मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे. अजितदादांनी अर्थसंकल्पात अनेक लोककल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आता आपण सर्वांनी करायचे आहे असा निर्धार बैठकीत केला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महिला, युवक, विद्यार्थी अशा सर्व घटकांना पक्षाशी जोडून घेत पक्ष संघटना बांधणी मजबूत करण्याचे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. सर्व फ्रंटल व सेलचे संघटन बांधून महायुती सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांच्यासह महिला, युवक, विद्यार्थी, ओबीसी, फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.