नवी दिल्ली, दि. १८ प्रतिनिधी :
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. या युवा विजेत्यांशी संवाद साधणे आणि माय भारत व्यासपीठाचा विस्तार वाढवण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करणे, हे या सत्राचे उद्दिष्ट होते, जेणे करून हे व्यासपीठ भारतातील तरुणांसाठी सहज उपलब्ध आणि फायदेशीर ठरेल.
डॉ. मांडवीय यांनी भारताच्या विविध राज्यांमधल्या, तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे, हवामान बदल, शहरी नियोजन, युवा सक्षमीकरण, अमली पदार्थ प्रतिबंध, यासारख्या विविध क्षेत्रात असामान्य योगदान देऊन आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा उल्लेख करून संवादाची सुरुवात केली. देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी युवा प्रतिभेचा शोध घेऊन त्याचे संवर्धन करण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.सहभागींना संबोधित करताना डॉ. मांडवीय म्हणाले, “भारतातील तरुण आपले भविष्यातील निर्णयकर्ते आहेत, आणि त्यांना सक्षम बनवण्याचे आपले सामुहिक प्रयत्न उत्साह वर्धक आहेत”.
माय भारत व्यासपीठावर तरुणांच्या विधायक सहभागासाठी नवोन्मेषी आणि सहयोगी संकल्पनांवर चर्चेचा भर राहिला. मांडवीय यांनी हे व्यासपीठ अधिक संवादात्मक, माहितीपूर्ण आणि आकर्षक बनवण्यासाठी पुरस्कार विजेत्यांकडून सूचना मागवल्या. पुरस्कार विजेत्यांनी काही कल्पना मांडल्या, जसे की, अधिक डिजिटल साधने समाविष्ट करणे, तरुणांशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी वन स्टॉप सोल्यूशन बनवणे आणि इच्छुक युवा नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन आणि इंटर्नशिप कार्यक्रम तयार करणे.डॉ. मांडवीय यांनी युवक आणि मंत्रालयादरम्यान सातत्त्यपूर्ण संवादाला प्रोत्साहन दिले, जेणे करून युवा भारतीयांच्या गरजा आणि आकांक्षांची योग्य रीतीने पूर्तता होईल.माय भारत व्यासपीठ युवकांच्या सहभागासाठी आणि विकासासाठी महत्वपूर्ण व्यासपीठ बनवण्याच्या सामूहिक दृष्टीकोनासह संवादाचा समारोप झाला. डॉ. मांडवीय यांनी भविष्याविषयीचा आशावाद, आणि भारताला प्रगती आणि नवोन्मेषाकडे घेऊन जाण्यासाठी तरुणांमधील परिवर्तनशील शक्तीवरचा आपला विश्वास व्यक्त केला.