नवी दिल्ली, दि. १८ वृत्तसंस्था :
वझिर एक्स या भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वझीर-एक्सवर या मंचावरील एका व्हॉलेटमधून हॅकर्सने साधारण २३ कोटी डॉलर्स म्हणजेच १९२३ कोटी डिजिटल रुपये चोरले आहेत. कंपनीनेदेखील या चोरीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सायबर हल्ल्याच्या मागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याचे बोलले जात आहे.या चोरीबद्दल वझीरएक्सने समाजमाध्यमावर माहिती दिली आहे.
“आमच्या मल्टिसिग व्हॉलेटमधील एक सुरक्षा व्यवस्थेला तोडण्यात आले आहे. आमची टीम या घटनेची चौकशी करत आहे. गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी सध्या भारतीय रुपया आणि क्रिप्टो करन्सी काढून घेण्याची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात येईल. तुमच्या धिराबद्दल तसेच ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आम्ही तुम्हाला याबाबतच्या अपडेट्स देत राहू,” असे कंपनीने समाजमाध्यमावर स्पष्ट केले आहे.हा प्रकार समोर आल्यानंतर क्रिप्टो स्टोअरेज प्रोव्हाईडर लिमिनल कस्टडीनीही स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही सुरक्षेचा भंग झालेला नाही. ज्या वॉलेट्सवर सायबर हल्ला करण्यात आला, ते वॉलेट्स लिमिनल कस्टडी इकोसिस्टिमच्या बाहेर होते. म्हणजेच लिमिनल प्लॅटफॉर्मवर असलेले वझीरएक्सचे सर्व वॉलेट्स सुरक्षित आहेत, असे लिमिनल कस्टडीने सांगितलंय.
दरम्यान, वझीर एक्सवर झालेला हा हल्ला भारतातील क्रिप्टो उद्योगासाठी मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही काळात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्य वाढले आहे. असे असताना हा सायबर हल्ला या क्षेत्रासाठी मोठा धक्का असल्याचे समजले जातेय.
यावरच CoinDCX चे सहसंस्थआपक नीरज खंडेलवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय बाजारात वझीर एक्स हा आमचा प्रतिस्पर्धी आहे. पण ही घटना समजल्यावर मला दु:ख झालं. भारतीय वेब इकोसिस्टिमसाठी ही चांगली बातमी नाही,” असे खंडेलवाल म्हणाले.