सातारा , दि. १९ :
व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून आणण्यात आलेल्या शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शन दलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या राजेशाही थाटात पार पडले.
यावेळी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला राजदरबाराच्या रुपात सजवण्यात आले होते. तर संग्रहालयाबाहेर शाही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्यामुळे साताऱ्यात शिवकाल अवतरला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी या वाघनखांच्या साहाय्याने प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. त्यामुळे या वाघनख्यांना मोठे महत्त्व आहे. मात्र ही वाघनखे इंग्रज अधिकाऱ्यांनी साताऱ्यातून आपल्याबरोबर नेल्याने गेली अनेक वर्षे ती लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.
ही शिवकालीन वाघनखे प्रदर्शनासाठी महाराष्ट्रात आणावी, यासाठी राज्यसरकारने लंडनच्या सरकारशी करार करून ती आता पहिल्यांदा राजधानी सातारा येथे आणण्यात आली आहेत. २० जुलैपासून या वाघनख्यांचे प्रदर्शन साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे सुरू राहणार असून याच प्रदर्शनाचे उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ही वाघनखे ठेवण्यात आली असून वाघनखांच्या संरक्षणाकरीता सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सार त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे.