छ.संभाजी नगर , दि. २० :
वडगाव कोल्हाटी रोडवर बत्तीस वर्षीय तरुणाचा गोळी झाडून , तसेच चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी हाती घेत तपासाची जलद गतीने चक्र फिरवून तरुणाचा खून करणाऱ्या चार आरोपींना काही तासात मुसक्या आवळल्या.
आरोपी जयेश उर्फ यश संजय फतेलष्कर आणि मयत कपिल सुदाम पिंगळे हे दोघे मित्र होते. मात्र मयत कपिल पिंगळे यांनी आपली मारण्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून तीन साथीदारांना सोबतीला घेत आरोपी जयेश उर्फ यश फतेलष्कर याने कपिल पिंगळे याच्यावर चाकूचे १७ ते १८ वार करून तसेच गावठी कट्ट्यातून एक गोळी मारून कपिल पिंगळे यांचा खून केला. सदर घटनेला मोठे गांभीर्य प्राप्त झाले असून या हत्याकांडात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांनी व्यक्त केली.