नवी दिल्ली, दि. २३ वृत्तसंस्था :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. कर रचनेतील बदलापासून महिला, शेतकरी आणि युवकांसाठी अनेक योजना आणल्याचं या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा असल्याची टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.
ते एक्स पोस्टवर म्हणाले, “मला हे जाणून आनंद झाला की माननीय अर्थमंत्रीने निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा जाहीरनामा वाचला आहे. मला आनंद आहे की त्यांनी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन अक्षरशः स्वीकारले आहे. (ELI) काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पृष्ठ 30 वर त्याचे वर्णन केले आहे.”“काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पृष्ठ ११ वर नमूद केलेल्या प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला भत्त्यासह शिकाऊ योजना सुरू केल्याचा मला आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील इतर काही कल्पनाही कॉपी केल्या असत्या, तर मला अजून आवडलं असतं. मी लवकरच गमावलेल्या संधींची यादी करेन,असंही चिदंबरम म्हणाले.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही मोदी सरकारवर टीकास्र सोडले. ते म्हणाले, “दहा वर्षांच्या नकारानंतर – जिथे नॉन-बायोलॉजिकल पीएम किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नोकऱ्यांचाही उल्लेख नव्हता. बेरोजगारी हे एक राष्ट्रीय संकट आहे ज्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्टपणे कबूल केले असल्याचं यातून स्पष्ट होतंय.”