Civics

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली – प्रवीण दरेकर

Share

ठाणे , दि.5 नोव्हेंबर :

विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांना करावयाचा आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या अडीच वर्षांत जनतेने स्थगितीचा अनुभव घेतला, व अलीकडच्या अडीच वर्षांत वेगवान प्रगतीचाही अनुभव घेतला, त्यामुळे निर्णय करणे आता सोपे झाले असून महायुतीला कौल देऊन जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली, आणि सर्वच क्षेत्रांत राज्याची पीछेहाट झाली. मुंबईतील आरे-कुलाबा मेट्रो प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झालेले असताना हा प्रकल्प थांबविल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्याचे १४ हजार कोटींचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले, अन्य अनेक जनहिताचे प्रकल्प रोखल्याने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि गरीब जनता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिली. मुंबईचा किनारी मार्ग, अटल सेतू, मेट्रो, नवा विमानतळ, झोपडपट्टी योजना, अशा अनेक सुविधांना महायुती सरकारने पुढे राबविल्या आणि बिघडलेला महाराष्ट्राचा मार्ग रुळावर आणला. समृद्धी महामार्गास महाविकास आघाडीने विरोध केला होत, मराठवाडा वॉटरग्रीड योनजेतून मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांनाही ठाकरे सरकारने खीळ घातली.

अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या जनहिताच्या आणि राज्यहिताच्या एका तरी कामाचा दाखला द्यावा, असे आव्हान दरेकर यांनी दिले. ठाकरे सरकारने प्रकल्प रोखले, आणि महायुती सरकारने त्यांना गती दिली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी केवळ सत्तेसाठी निवडणुका लढवत आहे, तर आमची महायुती विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, आणि काम दाखवून मते मिळविण्यासाठी निवडणुका लढवत आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.

सरकारने ठरविले, तर विकासाचे शानदार उपक्रम सरकार राबवू शकते, हे महायुती सरकारने सिद्ध केले आहे. विकासासोबत समाजजीवनाचा स्तर उंचावण्याच्या योजनाही राबविण्याची गरज ओळखून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी अशा अनेक घटकांसाठी महायुती सरकारने आखलेल्या योजनांमुळे राज्याच्या सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.यावेळी आमदार ऍड निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सागर भदे व मृणाल पेंडसे उपस्थित होते.

पटोले-पवार-ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने आपल्या सत्ताकाळात अनेक घोषणा केल्या, अनेक आश्वासने दिली, पण त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही, एकही घोषणा अंमलात आणली नाही, असे सांगून दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला. त्यांच्याच सत्ताकाळात एसटी कर्मचाऱ्यांची परवड झाली, वेतनही न मिळाल्याने १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, एमपीएससी परीक्षार्थींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडले, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीच्या घोषणेला हरताळ फासला, अनुसूचित जातिजमातींकरिता आयोग नेमण्यात दिरंगाई केली, अतिवृष्टी आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन पाने पुसली, कर्जमाफीच्या वारेमाप घोषणा करूनही अमलबजावणी केलीच नाही, आरक्षणाचा प्रश्न अधिक जटिल केला, प्रकल्प रखडले, उद्योगांना हिरवा कंदिल दाखविण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करून महाराष्ट्राची औद्योगिक प्रतिष्ठाही घालविली, अशा आरोपांची जंत्रीच दरेकर यांनी पत्रकारांसमोर वाचली.

याउलट महाविकास आघाडीने गेल्या सव्वादोन वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा प्रगती पुस्तकाद्वारे महाराष्ट्रासमोर मांडला असून सामाजिक, औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांमुळे राज्याचा बदललेला चेहरामोहरा आ जनतेसमोर आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नावाचा मुखवटा पांघऱून राज्याच्या विकासाचा विनाश करणाऱ्या अभद्र आघाडीला जनतेने नाकारले आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Related posts

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अकराव्या स्थानीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

editor

गेल्या काळात जर उद्धव ठाकरेंनी नीट काम केलं असतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती – आशिष शेलार

editor

विधानसभेनंतर आता पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध

editor

Leave a Comment