सांगली, दि. 15 नोव्हेंबर :
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी , कुरळप ता. वाळवा येथील इंदुबाई राजाराम पाटील वय ६५ हिचा दि. 7 रोजी कुरळप चांदोली वसाहत जवळील ऐतवडे खुर्द हद्दीतील उसाच्या शेतामध्ये पोटावरती विळ्याने वार करून खून करण्यात आला होता. दि 8 रोजी सदर घटनेची फिर्याद कुरळप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तेव्हा पासून आरोपीचा कुरळप पोलीस कसून तपास करत होते. मयत महिला ही शांत स्वभावाची व तिच्या कडे कोणतेही सोने नाणे किंवा प्रॉपर्टी नसल्याने हा खून कोणत्या कारणासाठी झाला असावा हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
यामुळे वरिष्ठ अधिकारी व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार करून मागील पाच दिवसापासून कसून शोध घेत होते. तर घटना घडले पासून संशयित म्हाकू दोडे हा ऐतवडे खुर्द गावातून गायब असल्याचे माहिती मिळाली होती.
बुधवार दि . 13 रोजी गोपनीय माहितीनुसार म्हाकू हा ऐतवडे खुर्द मध्ये आल्याची माहिती मिळाली ; यावरून तात्काळ कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी आपल्या पथका सह एतवडे खुर्द येथील स्मशानभूमी जवळ गेले असता एक व्यक्ती पोलिसांना पाहून पळून जात होता. त्याला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव म्हाकू आनंदा दोडे असल्याचे सांगत खुणाची कबुली दिली .
मात्र काही गोष्टी तो लपवत असल्याने त्याला पोलीस स्टेशनला आणून पोलीस खाक्या दाखवताच , त्याने मयत महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने आरडा ओरडा करत प्रतिकार करत असल्याने तिचा खून केल्याची कबुली दिली.
सदर कारवाई मध्ये सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार राजेश जाधव , पोलीस हवालदार कोळी , पो. ह. जाधव पो. नाईक देसाई,पो कॉ. सलमान मुलाणी, राहुल पाटील,पो. कॉ.धोत्रे यांनी सहभाग घेतला.