मुंबई, 28 डिसेंबर: (सुचिता भैरे)
मुंबई मनपाच्या ढिम्म कारभारामुळे गोरेगाव पश्चिम मधील सिद्धार्थ नगर येथे एक महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना काल येथे घडली. यात तिचे दोन्ही पाय तुटले असून डोक्यावरील कवटी वेगळी झाली आहे .
गोरेगाव पश्चिम, जुने सिद्धार्थ,नगर ,रोड नं-5, प्रबोधन क्रीडाभवनाच्या शेजारी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारचे खोदकाम सुरू आहे. बैठ्या चाळी असलेल्या जागेत हे काम सुरू आहे. यावेळी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी खोदकाम सुरू असताना, एका घराची भिंत कोसळून त्या घरात साफसफाई चे काम करीत असलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या घराची भिंत कोसळली ते दुमजली असून, त्या घराचे मालक यशवंत सामंत आहेत .या घराचा तळमजला त्यांनी भाडेकरूला भाडेतत्त्वावर दिला असून, पहिल्या मजल्यावर सामंत इयत्ता आठवी ते दहावीचे शिकवणी वर्ग घेतात. काल दिनांक 27 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या शाळेतील स्पोर्ट्स डे निमित्त त्यांनी क्लासला सुट्टी दिली होती. परंतु सदर घटनेत जखमी झालेली महिला शुभांगी देशमुख या पहिल्या माळ्यावर साफसफाई करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत शुभांगी देशमुख या गंभीर रित्या जखमी झाले आहेत . या मातीच्या ढिगार्याखाली जवळपास दोन तास त्या कण्हत होत्या. महिलेला झालेली दुखापत एवढी गंभीर होती की त्यात तिच्या डोक्यावरील कवटीचा भाग वेगळा झाला असून दोन्ही पायही तुटले आहेत .स्थानिक मनसे सैनिकांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे.
या दुर्घटनेत मनसे सैनिक नरेश सावंत, संजय खानविलकर व त्यांचे काही कार्यकर्ते ांनी या महिलेला त्या ढिगार्यातून बाहेर काढून ,गोरेगाव लिंक रोडवरील ऑस्कर या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करून, महानगरपालिकेच्या कंत्राट दारावर गुन्हा दाखल केला आहे.
सार्वजनिक रस्त्याचे कडेला अंतर्गत गटारे बांधण्यासाठीचे मुंबई महानगरपालिकेमार्फत आर .पी .एस. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सदर कंत्राटदार फर्ममार्फत काम पाहणारे पंकज पणानी यांच्याकडून अंतर्गत गटारे बांधण्यासाठी जे जे.सी.बी मशीनद्वारे खोदकाम सुरू होते हे सदर खोदकाम घराच्या अगदी भिंती लगत सुरू होते. तेव्हा सदर काम करणाऱ्या जे.सी.बी मशीनच्या ऑपरेटर कडून निष्काळजीपणे जे.सी.बी मशीनच्या बकेटचा जोरदार धक्का घराच्या भिंतीला लागून भिंत कोसळली .त्यामध्ये घराचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग कोसळला. त्यावेळेस सदर घराच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या क्लासेस मध्ये साफसफाई चे काम करणाऱ्या महिला शुभांगी देशमुख या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत .सदर खोदकाम करतेवेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी दुर्घटनास्थळी उपस्थित नव्हते. दरम्यान या कंपनीच्या कंत्राटदाराविरुद्ध व जेसीबी मशीनच्या ऑपरेटर विरुद्ध गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिथे काम चालू आहे तिथे बॅरिकेट्स ,ऑर्डन लावण्यात आलेले नाहीत. दुर्घटनाग्रस्त जागेत रहिवाशी घरात राहत असूनही तेथे मॅन्युअली काम करणं गरजेचं असतानाही जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात येत होतं. कामाच्या ठिकाणी मनपाचा कोणताही अभियंता देखरेखी साठी उपस्थित नव्हता .यामुळेच या जखमी महिलेच्या जीवावर मनपाचे हे काम बेतले असे म्हणण्यास मनपाच या गोष्टीला जबाबदार आहे.
एमएमआरडीए च्या नियमांच्या तरतुदीनुसार अशी दुर्घटना घडल्यावर तात्काळ त्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करून त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात येतं, परंतु महानगरपालिकेत अशी तरतूद नाही .त्यामुळे अशा मुजोर कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्याने ‘मन करे सो’ कारभार झालेला आहे .याला मनपा प्रशासनच जबाबदार आहे.