मुंबई, दि. ९ जानेवारी : ( प्रतिनिधी )
परभणीच्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्याने त्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन केली. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई, भाऊ आणि काही नातेवाईकांनी ५ जानेवारीला अकोला येथे आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीत सूर्यवंशी कुटुंबाने तपासाच्या संदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. तसेच या प्रकरणात येणाऱ्या अडचणीविषयी माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची तसेच राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.अनेकजण सूर्यवंशी कुटुंबियांना त्रास देत असून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. नवी मुंबईमध्ये एका मुलीवर अतिप्रसंग झाला होता. पीडितांच्या कुटुंबियांना त्या जागेत राहायचे नसल्याने त्यांनी त्यांची जागा सरकारला देऊ केली असून त्यांना नवीन ठिकाणी सरकारने स्थलांतर करावे. याबाबत धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा,ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.