Education national

मराठी भाषा संवर्धनासाठी राजधानीत विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

नवी दिल्ली, 28 जानेवारी :

मराठी भाषेची गोडी वाढविण्यासाठी कविता वाचन, व्याख्याने, पुस्तक विक्री प्रदर्शन, काव्य स्पर्धा, मराठीतील अविट कवितेच्या ओळी दररोज दर्शनीय भागावर लिहीणे, अशा विविध उपक्रमांना राजधानीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी दि. 14 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने दिल्लीतील निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेचा महाराष्ट्राबाहेर प्रचार व प्रसार होण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील दर्शनी भागात तसेच बाबा खडक सिंग मार्गस्थित महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्या दर्शनी भागात दररोज मराठीतील अजराअमर कवितांच्या ओळी लिहिण्यात आल्या. या कवितांचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांनी दाखवली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांवर कविता, व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी तसेच साहित्यिक डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यांची मराठीचा गौरव करणारी कविता सादर केली. शिक्षक दिपक पाचपुते, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, प्रा. डॉ. सुनील शिंदे यांचे मराठी भाषेवरील व्याख्याने प्रक्षेपित करण्यात आले.

दि.17 ते 19 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय पुस्तक विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या पुस्तक विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार निलेश लंके आणि शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.

दि.23 आणि 27 जानेवारी रोजी येथील नूतन मराठी शाळा आणि चौगुले पब्लिक स्कूलमध्ये कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या काव्य स्पर्धेस भाषिक विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र, रोख रक्कम देण्यात आली तर सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी करण्यासाठी निवासी आयुक्त निवा जैन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार, व्यवस्थापक भागवंती मेश्राम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, अधिक्षक रघुनाथ सोनवणे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे, लेखापाल राजेश पागदे, प्रशांत शिवरामे, अमिका महतो या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Related posts

जागतिक व्यासपीठावर चमकला महाराष्ट्राचा मराठी माणूस

editor

Pre-Monsoon Rains Offer Relief to South, North Gripped by Scorching Heatwave

editor

Prime Minister Modi’s Vision for India: Reflections on Elections and State Progress

editor

Leave a Comment