जळगाव दि.१६.फेब्रुवारी :
जामनेर,जळगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ दोन’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले.कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे.आता पुन्हा एकदा महिला आणि पुरुष कुस्तीपटू जागतिक पटलावर उत्तम कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. अशा कुस्तीपटूंसाठी ‘नमो कुस्ती महाकुंभ 2.0’ स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीष महाजन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे फडणवीस म्हणाले.
या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारताचे कुस्तीपटू विजय चौधरी, पृथ्वीराज पाटील आणि महिला कुस्तीपटू सोनाली मंडलिक यांना विजयी झाल्याबद्दल चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री व आ. अनिल पाटील, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय कुटे, आ. अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी उपस्थित होते.