मुंबई , दि. 28 जानेवारी : रमेश औताडे :
अमेरिकेच्या राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यास उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, शाश्वत विकास, वाहतूक व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी या महाराष्ट्रातल्या उपक्रमांवर चर्चा केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योगपती या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कामगिरीने भारावून गेले.
एलॉन मस्क (टेस्ला), सुंदर पिचाई (गूगल), आणि मसायोशी सोन (सॉफ्टबँक) यांसारख्या जागतिक नेत्यांशी संवाद साधत महाराष्ट्रातील प्रकल्पांना अधिक व्यापक आणि शाश्वत दृष्टीकोन कसा देता येईल याबाबत त्यांनी चर्चा केली.
अमेरिकेच्या ६० व्या राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यासाठी गायकवाड यांना विशेष निमंत्रण मिळाले होत.त्यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसीने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल घडवले आहेत. समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, मंत्रालय पुनर्बांधणी, तसेच भारतातील सर्वात लांब रस्त्यावरील बोगदा प्रकल्प यांसारखे उपक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवले आहेत. या प्रकल्पांनी महाराष्ट्राच्या दळणवळण आणि आर्थिक विकासाला गती दिली असून राज्याच्या प्रगतीसाठी नवी दिशा दिली आहे.
महाराष्ट्राच्या धोरणांना आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या संधींचा योग्य वापर करून महाराष्ट्राने आपले स्थान मजबूत केले असून, हे राज्य भविष्यातील विकासाचा एक नवा आदर्श घालून देत आहे