मुंबई, दि. 20 जानेवारी : सुचिता भैरे
अंधेरी येथे बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या रेस्टॉरंट संबंधित परवानगी तसेच इतर दस्तावेज माहिती अधिकाराच्या (आरटीआय) कायद्यांतर्गत मागण्यात आलेल्या अर्जाला संबंधित फाईल गहाळ झाल्याचे उत्तर ,वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांना मिळाले आहे.
महापालिकेच्या कार्यालयातून गुढपणे गहाळ होत असलेल्या फायलींचा दीर्घकाळ प्रश्न उपस्थित करीत , महत्त्वाच्या फायली गहाळ होण्याच्या प्रकारामुळे या विभागातील पारदर्शकता आणि त्याचे उत्तरदायित्व धोक्यात आल्याचा आरोप यावेळी पिमेंटा यांनी केला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेल्या पत्रात ,महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील सुमारे 3000 गहाळ झालेल्या फायलींबाबत गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गहाळ फायली आणि कथित अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी करण्यात सरकारचे अपयश असल्याचे अधोरेखित करताना, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पिमेंटा यांनी या पत्राद्वारे केली आहे.
पिमेंटा म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एका औद्योगिक परिसर सहकारी संस्थेच्या वतीने मी माहितीचा अधिकार (आर टी आय) कायद्यांतर्गत मोकळ्या जागेवर अतिक्रमण केलेल्या शकुंतला रेस्टॉरंटच्या ठिकाणची मंजूर योजना मिळवण्यासाठी दाखल केला होता. तथापि सार्वजनिक माहिती अधिकारी, (पश्चिम उपनगरे,I) यांनी दोन जानेवारी 2024 रोजी (आरटीआय) उत्तरा दाखल फाईल क्रमांक GBII/9988/A या कार्यालयाच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध नाही. (गहाळ फाईल) आम्हाला खेद वाटतो.कि तुम्हाला अपेक्षित माहिती देऊ शकत नाही! असे सांगण्यात आले.
असे केवळ हे एक प्रकरण नाही तर अनेक आहेत. बेकायदेशीर बांधकामे तसेच व्यावसायिक संरचनाबाबत फायली गहाळ झाल्याचे सोयीस्करपणे सांगण्यात येते. विभागातील बेकायदेशीर क्रियाकलक आणि भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे पिमेंटा यांनी यावेळी सांगितले.
पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून गहाळ झालेल्या फायलींची सखोल चौकशी करा. यातून होणारा भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंगच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खाते आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे हे प्रकरण द्यावे .यात दोषी आढळलेल्या अधिकारी व संस्थांविरुद्ध कारवाई करावी. अशी मागणी पिमेंटा यांनी केली आहे.