मुंबई प्रतिनिधी ,१० जून :
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती याशिवाय विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज, शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर म्हणजे १२ जूनला स्पष्ट होईल.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही उमेदवार दिले आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता माघारीच्या मुदतीपर्यंत ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार किंवा कसे, हे स्पष्ट होऊ शकेल.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माजी मंत्री अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने माजी मंत्री दीपक सावंत आणि भाजपने किरण शेलार यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे, काँग्रेसचे प्रकाश सोनवणे, शरद पवार गटाचे अशोक भांडगे तर समाजवादी गणतंत्र पक्षाच्या सुभाष मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे, शिवसेना शिंदे गटाच्या संजय मोरे, काँग्रेसच्या रमेश कीर, उद्धव ठाकरे गटाच्या किशोर जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमित सरैया आदी उमेदवारी रिंगणात आहेत.
दरम्यान, विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. मनसेने येथून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मनसेने येथून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने आज एक्स या समाज माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आगामी कोकण पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देऊ नये, अशी विनंती केली. तूर्तास या विनंतीस मान देऊन पक्षाचे उमेदवार अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत. या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या विनंतीस मान देऊन हे पाऊल उचलले असले तरी दरवेळेस हे शक्य होणार नाही हे निश्चित, असे मनसेने आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.