मुंबई,२७ मे :
बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळी विधाने करत असतात. त्यांचे राजकारणच सनसनाटी निर्माण करणे, प्रवाहाविरुद्ध बोलणे यावर अवलंबून आहे. सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो. बच्चू कडुही सत्तेत आहेत, दिव्यांग खात्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलीय. मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला कि दुरुपयोग केला. नवनीत राणासंबंधी त्यांचा टोकाचा विरोध आहे. तो राग ते महायुतीवर, सरकारवर काढताहेत. बच्चू कडू यांनी दीर्घाकालीन राजकारण करण्याची गरज आहे. असे तात्कालिक उद्वेग करून वागू नये, असा मैत्रीचा सल्ला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कडूंना दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले कि, अनेक पक्षाची लोकं या ईडीच्या कारवाईत आहेत. बच्चू कडू यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यापासून बच्चू कडू यांचे सरकारच्या विरोधात बोलणे वाढले आहे. त्यातूनच आता ईडी शिवाय बोलणे संपत नाही. म्हणून त्यांनी तो उल्लेख केलाय. कारवाई करताना कुठलीही तपास यंत्रणा पक्षीय दृष्टिकोन ठेवत नसतात हे बच्चू कडुंना माहित आहे. बच्चू कडू हे महायुतीसोबतच राहतील असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
तसेच अनिल परब यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले कि, अनिल परब यांनी असे मांडे खाऊ नयेत. आमच्यात उत्तम समन्वय आहे. कोण कुणाला चेपत नाही. चांगल्या समन्वयातून आमचे तिकीट वाटप झाले. शिंदे यांना लोकसभेच्या आवश्यक जागा होत्या. आमचा भाजपाचा, कार्यकर्त्यांचा टोकाचा आग्रह असतानाही शिंदे यांना जागा दिल्या. कारण आम्हाला महायुती टिकवायची आहे. कुठल्याही एखाद दुसऱ्या कारणाने महायुतीत वितुष्ट येईल असे आमचे नेते वागत नाहीत. अनिल परब यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावरून केलेल्या विधानाचा समाचार घेताना दरेकर म्हणाले कि, ४ जूनपर्यंत वाट पाहूया. ४ जुनचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातून, देशातून पंतप्रधान मोदींना एक प्रचंड जनाधार मिळाल्यानंतर उरली सुरली उद्धव सेना पुन्हा कुठे जातेय ते आपण पाहणार आहोत. गजानन कीर्तिकर हे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेत्याने प्रगल्भतेने भुमिका निभावण्याची गरज आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही पक्षाच्या चौकटीत, चार भिंतीत चर्चा व्हावी आणि त्या प्रश्नाचे उत्तर काढावे.
शिक्षक-पदवीधर निवडणुकीवरुन बोलताना दरेकर म्हणाले की, जेव्हा एकापेक्षा अनेक पक्ष युती-आघाडीत असतात त्यावेळी जागांच्या कुरघोडी, ओढाताण होतच असते. परंतु या सगळ्यात एकत्रित आम्ही ४८ जागा लढलो हे विशेष आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षकचा पण कुठलाही वाद निर्माण होणार नाही अत्यंत सामोपचाराने, समन्वयातून इलेक्टिव्ह मेरिटवर दोन्ही जागा दिल्या जातील.
दरेकर पुढे म्हणाले की, आमच्यात कुठल्याही प्रकारची धुसफूस नाही. उलट ही मुंबई पावसाळ्यापूर्वी स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी व्हावी हा मुख्यमंत्री शिंदे यांचाही प्रयत्न आहे, आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांचाही प्रयत्न आहे. मुंबईत पावसाळ्यात आपत्ती, अडचणी येणार नाहीत यासाठी आम्ही दक्ष आहोत आणि तशा पद्धतीने काम करत असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
शरद पवार यांचा रडीचा डाव सूरु आहे. ज्यावेळी अशा प्रकारचे व्हिडीओ येतात ईव्हीएमवर आक्षेप घेतले जातात, मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतले जातात त्यावेळेला आपला पराभव दिसू लागलाय हे स्पष्ट होते. ज्यावेळेस अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळी निश्चित समजायचे त्यांचा पराभव होऊ घातला असल्याचेही दरेकर म्हणाले.