भिवंडी ,७ जून :
यंत्रमाग नगरी भिवंडी शहरात शेंकडोंच्या प्रमाणात चाळी,मोहल्ले,सोसायट्या असून येथील लोकसंख्या १२ लाखांहून अधिक प्रमाणात आहे.अशा स्थितीत भिवंडीत अनधिकृतपणे नळ जोडण्यांद्वारे पाणी चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.याबाबत मनपा पाणीपुरवठा विभागाने चौकशी केली असता भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनाधिकृत नळ कनेक्शनची संख्या वाढली असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले.तसेच पाणीपुरवठा वितरण प्रक्रीया विस्कळीत होउन नागरीकांना कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
याकरिता अशा अनाधिकृत नळ जोडण्या धारक,प्लंबर यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी पाणीपुरवठा विभागास दिले होते.त्यामुळे भिवंडी महापालिकेने पाणी चोरांविरोधात धडक कारवाई हाती घेतली असून अनधिकृतपणे नळ जोडण्यातून पाणी चोरणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने संबंधित हद्दीतील पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवले आहेत.
दरम्यान २० मार्च रोजी या कारवाईस सुरुवात झाली असून १ जून पर्यंत अशा अडीच महिन्यांच्या कालावधीत एकूण ९२ अनधिकृत नळ जोडण्या कापत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये २० मार्च रोजी नारायण कंपाऊंड मधील अतुल सायजिंग डाईंग येथील ६ अनधिकृत नळ जोडण्या कापून सदर डाईंगवर फौजदारी कारवाई करण्यात आली.तर त्याच दिवशी बाबला कंपाऊंड येथील राज सिंथेटिक डाईंगच्या ५ अनधिकृत नळ जोडण्या कापून तिच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच अनुक्रमे ३ एप्रिल रोजी आस.बी.बी रोड येथील रुंगठा सायजींगच्या २ अनधिकृत जोडण्या कापण्यात येवून सदर डाईंगवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे २८ मे रोजी महाकाल डाईंग, केदारनाथ डाईंग,श्रीकार डाईंग,विवा डाईंग येथील २ अनाधिकृत नळ जोडण्या कापण्याची कारवाई करण्यात आली.यासह २९ मे रोजी विवा फॅब्रीक,निलेश टेक्सटाइल, शोर्य ड्रिमवर्क्स येथील तब्बल २३ अवैध नळ जोडण्या कापण्याची कारवाई करण्यात आली.तसेच ३० मे रोजी शंकर डाईंग, कैलाश डाईंग, जैनम ग्रिन्स अपार्टमेंटच्या बाजुला देवजीनगर, आदेशवर सिचेंटीक्स येथे टाकण्यात आलेल्या सुमारे १९ अनाधिकृत नळ जोडण्या कापण्याची कारवाई करण्यात आली.यापैकी शंकर डाईंग व कैलाश डाईंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे ३१ मे रोजी रोजी अतुल सायजींग करीता भारत कंम्पाऊंड येथील बावडीतुन घेण्यात आलेल्या अनाधिकृत ११ नळ जोडण्या कापण्याची कारवाई करण्यात येवून याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जून रोजी दोडीया डाईंग, दुर्गा डाईंग व नारपोली गांव येथील एकुण ६ अनधिकृत नळ जोडण्या कापण्याची कारवाई करण्यात आली आहे.अशा प्रकारे ७४ दिवसांत एकूण ९२ अनधिकृतरित्या जोडण्यात आलेल्या नळ जोडण्या कापण्याची कारवाई मनपा प्रशासनाने केली असून २५ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत
.त्यामुळे एकीकडे महापालिकेच्या या अवैधपणे नळ जोडणी प्रकरणी धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर पाणी चोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.दुसरीकडे पाणीपुरवठा प्रक्रिया विस्कळीत होऊन कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा पाण्या बाबतचा मनपा प्रशासनाच्या विरोधातील आक्रोश कमी होऊन या कारवाई सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.