politics

भाजपा कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे

Share

धाराशिव येथे भाजपाच्या चिंतन बैठकीत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन

धाराशिव ,२४ जून :


लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु देशात स्पष्ट बहुमताचे सरकार प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना जनादेश देऊन एनडीए सरकार स्थापन करण्याची पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

धाराशिव येथे भारतीय जनता पार्टीची चिंतन बैठक रविवार, २३ जून रोजी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी दानवे बोलत होते. बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री संजय केणेकर, माजी जिल्हाध्यक्ष अनिल काळे, दत्ता कुलकर्णी, अ‍ॅड.व्यंकटराव गुंड, अ‍ॅड.अनिल काळे, प्रवीण पाठक, इंद्रजित देवकते, प्रदीप शिंदे, विकास कुलकर्णी व इतर पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत पदाधिकार्‍यांना संबोधीत करताना दानवे म्हणाले की, महाराष्ट्राचा विचार केल्यास जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. परंतु देशात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना मित्रपक्षांसह स्पष्ट जनादेश देऊन बहुमताचे सरकार हाती दिलेले आहे. भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे बहुमताने सरकार स्थापन झालेले असताना काँग्रेसची मंडळी मात्र ४०० पार चा आकडा पूर्ण होऊ दिला नाही म्हणून आनंद व्यक्त करत आहेत. एनडीएमधील घटक पक्षाच्या जागा आल्या नाहीत त्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आहेत. याची जाणीव भाजपा व मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना व्हावी म्हणून मराठवाड्यात हे दौरे सुरु केलेले आहेत. राजकारणात हार आणि जीत होत असते. हा जनादेश आपण मान्य केलेला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या दमाने आणि ताकदीने आपल्याला जनतेसमोर जायचे आहे, पक्षाची भूमिका मांडायची आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील असा अपप्रचार केला. वास्तवात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणालाही हात लावता येणार नाही, असे स्पष्ट केलेले असताना विरोधकांनी अपप्रचार करुन मते मिळविली. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही याची खात्री आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी पुन्हा पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी त्यांनी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली.

Related posts

कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का ?

editor

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपात अंतर्गत कुरघोडीचा वाद उफाळणार ? पक्षश्रेष्ठींनी जागा वाटपाच्या तिढ्याबाबत विचाराने निर्णय घेण्याची वेळ !भिवंडी विधानसभेत २ आमदार हॅट्रिकवर ,१ चौथ्यांदा नशीब आजमवणार

editor

संजय राऊत यांनी रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले – बावनकुळे

editor

Leave a Comment