International

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिचमध्ये उत्स्फूर्त स्वागत

Share

महाराष्ट्राच्या उर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना येथे अनुभवली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दावोस, दि. 20 जानेवारी :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॅानॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी झ्युरिच, स्वित्झर्लंड येथे नुकतेच आगमन झाले. हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्यावतीने त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करत, स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी, झ्युरिचमधील लहान मुलांनी मराठी गौरवगीत सादर करत ‘पुन्हा येण्या’ची भावना अधोरेखित केली. वेदांत, हृषिकेश, रश्मी आणि अद्विका या चिमुकल्या दोस्तांनी आपल्या निरागस शुभेच्छा देऊन उपस्थितांचे मन जिंकले. या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विविध भागांतून मराठी बांधव आवर्जून उपस्थित राहिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, “या स्वागताने मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या उर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम‘ची भावना येथे अनुभवली.मुख्यमंत्री फडणवीस ‘दावोस समिट 2025’ साठी झ्युरिचमध्ये दाखल झाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.

बृह्न महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

याप्रसंगी बृह्न महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related posts

British PM Rishi Sunak Clarifies Call for July 4 Snap Elections

editor

भूमी पेडणेकर भारतातील एक तरुण ग्लोबल लीडर म्हणून दावोस 2025 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी सज्ज!

editor

Tragedy Strikes: Singapore Airlines Flight Hit by Turbulence

editor

Leave a Comment