मुंबई प्रतिनिधी ,१० जून :
राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत असून त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण सत्ताधारी पक्ष निवडणुका आणि राजकीय साठमारीत व्यग्र आहे. राज्य सरकारचे दुष्काळाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता राज्यपालांनी या प्रश्नी लक्ष घालून जनतेला मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
शेतकऱ्यांची अवस्था पाहता कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, बागायती शेतीला एकरी ५० हजार रुपये तसेच फळबागांना एकरी १ लाख रुपये मदत तातडीने द्यावी. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात. पिण्याच्या पाण्याची सोय करावी. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दिली.यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले आहे.
राज्यातील जनता सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. जवळपास १० हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहेत. शेतकरी संकटात आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट करावी लागत आहे. धरणामधील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. मुंबईसह अनेक शहराच्या पाणी पुरवण्यातही कपात केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट आहे. शेतीला पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असे निवेदनात म्हटल्याचे पटोले यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यातील जनता अत्यंत अडचणींचा सामना करत आहे. दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहे पण राज्य सरकार मात्र अजगरासारखे सुस्त पडून आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असतानाही सत्ताधारी पक्ष त्याकडे फारसे गांभिर्याने पाहत नाही, हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने केवळ आढावा बैठक घेण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक पालकमंत्री गैरहजर होते. त्यामुळे सरकारला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच गैरप्रकार झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.त्याचा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार आहे. विद्यापीठाचे पोर्टल चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी ग्रेड सिस्टममधील गुण ओळखू शकत नाहीत. तसेच ते नोकरी, शिष्यवृत्ती किंवा पुढील अभ्यासासाठी अर्ज करू शकत नाहीत. १०० पेक्षा जास्त दिवस उलटूनही अंतिम वर्ष आणि पुरवणी परीक्षेचे निकाल पूर्णपणे जाहीर केलेले नाहीत. ज्यामुळे विद्यार्थी चिंता आणि नैराश्याचे कारण बनले आहेत. विद्यार्थी दिलेल्या गुणांबाबत असमाधानी आहेत आणि विद्यापीठाने ज्या पद्धतीने पेपर तपासणी प्रक्रिया केली आहे त्यात गैरप्रकार झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात केली आहे.