धुळे , ८ जुलाई :
धुळे तालुका खरेदी – विक्री संघाच्या निवडणुकीसाठी आज दि ८ जुलाई २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. धुळे तालुका खरेदी विक्री संघावर काँग्रेस प्रणित जवाहर शेतकरी पॅनलचे आमदार कुणाल पाटील यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवत. प्रतिस्पर्धी भाजपा प्रणित शेतकरी सेवा पॅनलचा सुपडा साफ केला आहे.
यंदा आमदार कुणाल पाटील यांचे जवाहर शेतकरी पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने १५ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनल विरोधात भाजपाने देखील माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सेवा पॅनल उभे केले होते. मात्र आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनलने भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवत १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवत धुळे तालुका खरेदी – विक्री संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.