Civics

भ्रष्टाचारामुळेच वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा ; महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी: नाना पटोले

Share

मुंबई , ११ जुलै :

राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.


विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले म्हणाले की, समृध्दी महामार्गात झालेल्या भ्रष्टाचारामुळेच रस्त्याला भेगा पडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या १८ हजार कोटी रुपयांच्या अटल सेतूलाही भेगा पडल्याचे आम्ही उघड केले होते, समृद्धीला भेगा, अटल सेतूला भेगा यातून मोदींची गॅरंटी किती तकलादू आहे हे स्पष्ट झाले. भ्रष्टाचाराचे धिंडवडे निघत आहेत परंतु महायुती सरकारला जराही लाज शरम वाटत नाही, असे पटोले म्हणाले.

सरकारने काल मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक चर्चेत आणला. वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस यांनीच २०१४ साली धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे बहुमताचे सरकार असतानाही केवळ विरोधकांवर कुरघोडी करायची यासाठी सत्ताधारी पक्षांनी गोंधळ घातला. ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यावर विरोधी पक्ष सरकारचे पितळ उघडे पाडणार होते पण गोंधळात पुरवणी मागण्या मान्य करून सरकारने लोकशाहीचा खून केला. विधानसभेचे अध्यक्ष एकतर्फी कामकाज करत होते, विरोधकांना बोलू दिले जात नव्हते फक्त सत्ताधारी मंत्री व सदस्यांनाच ते बोलू देत होते. अध्यक्षांनी पक्षपाती राजकारण करून महाराष्ट्र विधान सभेच्या परंपरेला काळीमा फासला आहे. शिंदे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही नाना पटोले म्हणाले.


महायुती सरकार उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करते आणि लाडकी बहिण योजनेतून राज्यातील भगिनींना मात्र फक्त १५०० रुपये देऊन फसवणूक करत आहे. प्रचंड महागाई असताना सरकार केवळ १५०० रुपये देऊन माता भगिनींची बोळवण करत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

Related posts

१२ हजार नावे पुरवणी मतदारयादीतून वगळली, ॲड अनिल परब यांचा आरोप

editor

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करणे आणि महिलांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार – सुनिल तटकरे

editor

Leave a Comment