Mahrashtra Sports

ओघवत्या शैलीतील क्रिकेट वृत्तांकनाने आणि रसाळ समीक्षणाने अनेक चाहत्यांना क्रिकेटच्या प्रेमात पाडणारे क्रिकेट समीक्षक , लेखक द्वारकानाथ संझगिरी काळाच्या पडद्याआड

Share

मुंबई, दि.6 फेब्रुवारी :

प्रसिद्ध मराठी लेखक आणि क्रिकेट समालोचक द्वारकानाथ सांझगिरी यांचे मुंबईत ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी आणि इतर भाषांमध्ये स्तंभलेखक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत असले, तरी त्याची जगभर ओळख निर्माण करण्यात संझगिरी यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांच्या ओघवत्या शैलीतील क्रिकेट वृत्तांकनाने आणि रसाळ समीक्षणाने अनेक चाहत्यांना क्रिकेटच्या प्रेमात पाडले.

क्रिकेटसह नाट्य, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातही संझगिरी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. क्रिकेटवर अखेरपर्यंत निस्सीम प्रेम करणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेतील एक उज्ज्वल पर्व समाप्त झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे मुख्यमंत्री यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.

तसेच प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. क्रिकेटवर लिहिणे, बोलणे आणि मराठी साहित्यातली रुची यामुळे त्यांनी क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनाने हरहुन्नरी समीक्षकाला मुकलो असल्याची शोकभावना क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात क्रीडा मंत्री भरणे म्हणतात की, मराठमोळे समीक्षक म्हणून द्वारकानाथ संझगिरी यांची ओळख होती. क्रिकेटचा सामना आपल्या लेखणीतून समोर उभा करण्याचे त्यांचे कोशल्य अतुलनीय होते. म्हणूनच क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या लेखणीला कायमच दाद दिली. क्रिकेटची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळं आपल्या लेखणीने अचूक मांडणारा लोकप्रिय असा अवलिया समीक्षक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने हरहुन्नरी लेखणी शांत झाली आहे. त्यांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, त्यांचे लेखन क्रिकेट रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहील. मी या प्रख्यात मराठमोळ्या समीक्षकाला श्रद्धांजली वाहतो. संझगिरी कुटुंबियांवर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखात आम्ही सहभागी आहोत.अशा शब्दात क्रीडा मंत्री भरणे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.

Related posts

राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांमधून कामगारांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

editor

नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर; चोपडा तालुक्यात ९७२ मतदारांचा समावेश

editor

मालसाणे शिवारात एस.टी. बसची कंटेनरला धडक; पंधरा जण जखमी

editor

Leave a Comment