politics

लोकसभा निवडणुकीत भाजपमुळे एकनाथ शिंदेंचे नुकसान ; शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका

Share

मुंबई प्रतिनिधी ,दि २१ जून :

लोकसभा निवडणुकी भाजपच्या काही नेत्यांमुळे भाजपचे तर नुकसान झालेच शिवाय एकनाथ शिंदेंचेही नुकसान झाले, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. लोकसभा निवडणुकीत भाजपमधील काही नेत्यांनी हट्ट केला. त्यातून मुख्यमंत्री शिंदेंवर जो अन्याय झाला तो अन्याय विधानसभेत होऊ नये, असा माझा प्रयत्न होता. तीच भूमिका मी काल वर्धापनदिनात मांडली, असेही कदम यांनी सांगितले.

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धानपदिनाच्या कार्यक्रमात बोलताना कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला १०० जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. तसेच भाजपच्या हट्टामुळे शिंदे गटाचे अनेक उमेदवार निवडून आले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना आज कदम यांनी आज भाजपच्या चुकांवर बोट ठेवले.

लोकसभेत आम्हाला १५ जागा देण्यात आल्या. गेल्यावेळी आमचे १८ खासदार होते. यावेळी आम्हाला १५ जागा मिळूनही जर का उमेदवार भाजपप्रमाणेच वेळेवर जाहीर केले असते, तर आमचे १३ ते १४ खासदार निवडून आले असते. पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला लटकविण्यात आले. ठाणे, कल्याण, नाशिक जागेवर भाजपनेच दावा ठोकला होता . मुख्यमंत्र्यांचा लेक निवडून येणार नाही, असे सांगितले. पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळीला तिकीट नाकारण्यास सांगितले. हिंगोलीचा जाहीर झालेला उमेदवार बदलण्यास भाग पाडले. भाजपने आमचे आम्हाला बघू द्यायला हवे होते, असे कदम यांनी सुनावले.

आता आम्ही विधानसभेच्या जागावाटपात १०० जागा मागितल्या आहेत. त्यातल्या आम्ही ९० जागा जिंकू. ही आमची विनंतीवजा मागणी आहे. माझ्या नावात भाई असले तरी मी विनंती करत आहे. आम्ही भाऊ म्हणून तुमच्याकडे विश्वासाने आलो. तर आपण दोघे भाजप आणि शिवसेना भाऊ वाटून खाऊ. जेवढ्या जागा तुम्ही लढविणार तेवढ्या जागा आम्हाला द्या, अशी मागणीच रामदास कदम यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेलाही कदम यांनी उत्तर दिले.आमच्यामुळे राष्ट्रवादीची एक लंगोट वाचली. सुनील तटकरे कुणामुळे निवडून आले, हे विचारा. रायगडमध्ये भाजपने धैर्यशील पाटील यांची उमेदवारी निश्चित केली होती. पण ही उमेदवारी सुनील तटकरेंना मिळवून देण्यात आम्ही काय प्रयत्न केले, असे कदम म्हणाले.

Related posts

कीर्तिकरांचा सदैव सेवेसाठी तत्पर राहण्याचा वचननामा

editor

उत्तर पश्चिमच्या जागेसंदर्भात कोर्टची लढाई लढणार -आदित्य ठाकरे

editor

वाढवण बंदर प्रकल्प भाजपा सरकार जनतेवर जबरदस्तीने लादत आहे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप….!

editor

Leave a Comment