नंदुरबार ,१३ जून :
जिल्हात पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. मागील आर्थिक वर्षात मिरचीची विक्रमी आवक बाजार समितीत झाली होती . विक्रमी आवक झाल्यामुळे मिरचीला चांगला भाव बाजार समितीत मिळाला होता त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होतांना दिसत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे परंतु पाहिजे तसा पाऊस अजून पर्यंत पडला नाही परंतु बागायतदार शेतकऱ्यांनी पहिले पासूनच पिकं लावण्यास सुरुवात केली आहे .यावर्षी नंदुरबार तालुक्यात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी करत आहेत. मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मिरची कडे लक्ष केंद्रित केले आहे .
विकास पाटील यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रात गौरी या वाणाची मिरची लावली आहे. २ वर्षा पासून विकास पाटील हे मिरची लागवड करीत आहे. मिरचीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे निघावे आणि कमी पाण्याचा वापर होऊन रोप चांगल्या प्रकारे जगतील यासाठी विकास पाटील यांनी संपूर्ण क्षेत्रात मंचीग टाकून अर्थात प्लास्टिकचे आच्छादन करून मिरची लागवड केली आहे. यामुळे अनावश्यक तण उगत नाही व कमी पाण्यात चांगल्या प्रकारे पीक जगून उत्पन्न चांगले निघते. मागील आर्थिक वर्षा प्रमाणे या वर्षी ही मिरचीची बाजारात विक्रमी आवक होऊन चांगला दर मिरचीला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.