मुंबई, दि.16 जानेवारी :
राष्ट्रस्तरीय लंगडी खेळ स्पर्धेमध्ये प्रथमच प्रतिनिधित्व केल्याने मिरा भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पीएम श्री शाळा क्रमांक २२ या शाळेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
दिनांक ०९ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत १४ वी राष्ट्रीय ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप लंगडी स्पर्धेचे आयोजन विजयवाडा, आंध्रप्रदेश येथे करण्यात आले होते. प्रथमच पीएम श्री मनपा शाळा क्रमांक २२ या शाळेला राष्ट्रीय स्तरावर लंगडी या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली होती. मनपा शाळा क्रमांक २२ मधील विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून उपांत्यपूर्व फेरी पर्यंत यशस्वी प्रवास केला.
यापूर्वी महानगरपालिका स्थापना झाल्यापासून महापालिकेच्या कोणत्याही शाळेने राष्ट्रस्तरीय खेळाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला नव्हता. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कौशल्ये आणि खेळभावना विकसित व्हावी, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत व मुख्य म्हणजे क्रीडा शिक्षकांचा अभाव ही बाब लक्षात घेत , आयुक्त यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या शाळांमध्ये ०७ क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकीमुळे विद्यार्थ्यांकडून नियमित कबड्डी, खो-खो, लंगडी, धावणे यांसारख्या स्पर्धात्मक मैदानी खेळांचा सराव करून घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासात वाढ व्हावी, खेळ खेळताना समन्वयता निर्माण होणे, खेळाडूवृत्ती विकसित व्हावी यासाठी विद्यार्थ्यांकरिता नियमित सराव सत्र ठेवले जातात.
क्रीडा शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाने भविष्यातही महापालिका शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धेत मिरा भाईंदर शहराचे प्रतिनिधित्व करतील असे आयुक्त यांनी म्हटले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.