कोल्हापुर ,दि. २० :
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा भरून वाहत आहे. सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ७६ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. तर पंचगंगेची पाणी पातळी ३६ फुटांवर पोहोचले आहे. इशारा पातळी ३९ फूट आहे तर धोका पातळी ४३ फूट आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरं शहरासह धरण क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरासह धरण क्षेत्र आणि जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा भरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलाय.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात २९.९ मिमी पाऊसाची नोंद झाली असून मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालीये.
पंचगंगाची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरु असून असाच पाऊस सुरू राहिला तर संध्याकाळपर्यंत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण ७२ टक्के भरलं असून धरणाच्या विद्युतविमोचनातून १४५० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.