मुंबई , दि. ९ जानेवारी , ( वार्ताहर ) :
विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने सर्वोतपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, सध्या बांधकाम सुरू असलेले मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला हे नुतनीकरणाचे प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण होण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंतिक दक्षता घ्यावी, असे निदेश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. आज दिनांक ९ जानेवारी रोजी विधान भवन, मुंबई येथे विधानमंडळ कामकाज आढावा घेण्यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी वर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नूतन मनोरा आमदार निवासचे बांधकाम सुरू झाले असून त्यामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजन कक्ष, सदस्य आणि सहायकांसाठीची प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. मॅजेस्टीक आमदार निवासचे देखील वारसा वास्तूवैभव कायम ठेऊन अतिशय देखणे असे नुतनीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने पीठासीन अधिकारी यांच्या निवासासाठी मलबार हिल येथे “अजिंठा” इमारतीची सुसज्ज वास्तू उभारण्यात येत आहे. ही सर्व बांधकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत आणि सन्माननीय सदस्यांना तातडीने त्याचा लाभ प्राप्त व्हावा यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने उचित कार्यवाही करावी अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.