Culture & Society national

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य’ संमेलनाचे उद्घाटन

Share

“मराठी सारस्वतांना माझा नमस्कार” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली , दि.21फेब्रुवारी : ANI

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित संमेलनाचा भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत.शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे दिग्गजांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटनाचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला.काश्मिरी कन्या रुकय्या मकबूल हिच्या आवाजात मराठीप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या प्राकृत भाषेतील सुमारे २५०० वर्षांपूर्वीच्या मंगलकामना करणाऱ्या जैन धर्मातील नवकार मंत्राने सुरुवात झाली. शमिमा अख्तर या काश्मिरी गायिकेने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राच्या राज्यगीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.सात दशकांनंतर दिल्लीत होणारा हा कार्यक्रम २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवस चालेल.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने अध्यक्षा प्रा. उषा तांबे व उपाध्यक्ष गुरय्या स्वामी यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठल-रुक्मिणीची अतिशय सुंदर मूर्ती देऊन केला. तसेच सरहद संस्थेच्या वतीने शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवमुद्रा व त्यामध्ये लेखणी असलेले संमेलनाचे बोधचिन्ह, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा आणि जरीपटका ही संमेलनाची स्मरणिका देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. नरेंद्र मोदी यांना संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं आश्वासन दिलं, असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार काय म्हणाले?


“मराठी सारस्वतांची दिंडी आज दिल्लीला आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. नोकरी कामाच्या निमित्ताने अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतात. मराठी साहित्याचा अद्भूत अनुभव घेण्यासाठी आपण इथे जमलो याचा मला मनापासून आनंद आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासून आनंद आहे”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.


“आजचे साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीने आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे शासन, महाराष्ट्राचे साहित्यक, रसिक, या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला, ती गोष्ट म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. हा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी भाषिकांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करतो”, असं शरद पवार म्हणाले.


“1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी संमेलनाचे उद्घाटन केलं होतं. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं. यानंतर 70 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत संमेलनाचे उद्घाटन होत आहे याचा आनंद आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“मी ज्यावेळेला संमेलनाचं उद्घाटन देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी अक्षरश: एक मिनिट सुद्धा लावला नाही. महाराष्ट्राचा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे, असं त्यांनी सांगितलं. चंद्रभागेच्या काठी आषाढी कार्तिकेला जसे लाखो भाविक भक्तीभावाने जमतात तसंच साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राचे हजारो साहित्यप्रेमी दरवर्षी येत असतात. हे साहित्य संमेलन तुमच्या माझ्या आयुष्याचे महत्त्वाचे भाग आहे”, असंदेखील शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले .

मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. “मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचं भाषण झालं. तेव्हा मी म्हटलं की फारच छान, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिलं. मला पण गुजराती अवडायची असं त्या म्हणाल्या. देशाच्या आर्थिक राजधानीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी केली.

“मराठी साहित्याच्या या संमेलनात महाराष्ट्राची सांस्कृतिक विरासत आहे. ग्यानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. ग्यानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. पहिल्या आयोजनापासून आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा देश साक्षी राहिला आहे. महादेव गोविंद रानडे, हरिनारायण आपटे, माधव श्रीहरी अणे, वीर सावरकर, देशातील अनेक महान व्यक्तींनी या संमेलनाची अध्यक्षता स्वीकारली आहे. आज शरद पवार यांच्या आमंत्रणावरून मला या गौरवपूर्ण परंपरेबरोबर जोडण्याचं भाग्य मिळालं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच आपल्याला या गोष्टींचा गर्व आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे आपले १०० वर्ष साजरे करत आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Related posts

गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव नगरीत भाविकांची मंदियाळी ; हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक

editor

शिवसंस्कार घडवणारी ‘शिवसृष्टी’!

editor

आशियाई तायक्वांदाे अजिंक्यपद स्पर्धा

editor

Leave a Comment